...म्हणून संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक लेखिकांनी टाळली  : डॉ. रवींद्र शोभणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 12:25 IST2025-01-12T12:24:56+5:302025-01-12T12:25:30+5:30

डॉ. शोभणे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’च्या ठाणे कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.

...That's why the writers avoided the election for the post of conference president: Dr. Ravindra Shobhane | ...म्हणून संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक लेखिकांनी टाळली  : डॉ. रवींद्र शोभणे

...म्हणून संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक लेखिकांनी टाळली  : डॉ. रवींद्र शोभणे

ठाणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची १०० व्या संमेलनाकडे वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत पार पडलेल्या ९७ साहित्य संमेलनात केवळ पाच लेखिकांना संमेलनाच्या अध्यक्षा होण्याचा मान मिळाला. कारण अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचाराचा दर्जा महापालिका निवडणुकीसारखा घसरला आहे. यात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. या भीतीपोटीच लेखिकांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविणे टाळल्याचे मत मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. 
डॉ. शोभणे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’च्या ठाणे कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.

शोभणे म्हणाले की, भारत आणि भारताबाहेर जगाच्या पाठीवर जिथं कुठं मराठी माणूस राहतो त्या ठिकाणी मराठी साहित्य संमेलन भरविता येते. ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी दिल्लीत होत आहे. यापूर्वी संमेलन दिल्लीत झाले आहे. त्याचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. संमेलन शंभरीकडे वाटचाल करीत आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावती देशपांडे, दुर्गाबाई भागवत, विजया राजाध्यक्ष, शांता शेळके आणि अरुणा ढेरे या पाच लेखिकांना मिळाला. 

दिल्ली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान विदुषी तारा भवाळकर यांना मिळाला आहे. विजया राजाध्यक्षांनी जेव्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढविली तेव्हा त्यांच्या विरोधात पराभूत साहित्यिकांविषयी अनुद्गार काढले नाही. उलट त्यांच्या साहित्य कार्याचा गौरव केला होता. मराठी साहित्य वाङ्मयीन संस्कृतीत यापूर्वी एकमेकांविषयी आदर होता. आता तो आदर लोप पावत चालला आहे. 

विश्वकोशाचे खंड अद्ययावत होणार
मराठी विश्वकोशाचे ५० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या खंडात आता भर घालण्याचे काम सुरू आहे. हे खंड अद्ययावत केले जाणार आहेत. विश्वकोशात काही राजकीय व्यक्ती आणि संघटनांचा उल्लेख समाविष्ट करणे आवश्यक आहे. वानगीदाखल डॉ. शोभणे यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे नाव घेतले. विश्वकाेशाच्या निर्मितीवर आतापर्यंत समाजवादी, डावा विचारसरणीचा प्रभाव होता. 

आता उजव्या विचारसरणीच्या नेत्यांचा व संघटनांचा विश्वकोशात समावेश करण्याचा हा प्रयत्न आहे का, असे विचारले असता डॉ. शोभणे म्हणाले की, विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करताना वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. कोणतीही मल्लीनाथी केली जाणार नाही. विश्वकोश निर्मिती मंडळावर वेगवेगळ्या विचारसरणीच्या विद्वान व्यक्तींनी काम केले. मात्र, त्यांची विचारसरणी विश्वकोशाच्या निर्मितीत कुठेही डोकावली नाही. तीच परंपरा कायम ठेवणार आहे. विश्वकोश गुगलपेक्षा जास्त विश्वसनीय आहे. न्यायालयीन खटल्याच्या सुनावणीतही विश्वकोशाचे संदर्भ घेतले जातात, असे डॉ. शोभणे यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: ...That's why the writers avoided the election for the post of conference president: Dr. Ravindra Shobhane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.