ठाणेकरांचे कान शाबूत पण श्वास कोंडला, ध्वनिप्रदूषण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 03:50 IST2017-10-22T03:48:58+5:302017-10-22T03:50:05+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दिवाळीत ठाण्यातील ध्वनिप्रदूषणाची मात्रा कमी झाली असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे.

ठाणेकरांचे कान शाबूत पण श्वास कोंडला, ध्वनिप्रदूषण घटले
ठाणे : मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दिवाळीत ठाण्यातील ध्वनिप्रदूषणाची मात्रा कमी झाली असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. गतवर्षी लक्ष्मी पुजनाच्या दिवशी ध्वनिप्रदूषणाची मात्र १२५ डेसीबल एवढी होती तर यंदा ती ९५ डेसीबलच्या आसपास नोंदली गेली. एकीकडे ध्वनिप्रदूषण काही अंशी कमी झाले असले तरी वायुप्रदूषणाचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही.
ठाणे महापालिका प्रशासन, पोलीस आणि काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गणेशोत्सव तथा नवरात्रोउत्सवादरम्यान करण्यात आलेल्या जनजागृतीचा परिणाम अखेर दिवाळीत दिसून आला आहे. त्यामुळेच यंदा आवाजांच्या फटाक्यांची मागणी कमी झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी लक्ष्मी पुजनाच्या दिवशी ध्वनिप्रदूषणाची मात्रा १२५ डेसीबल होती. ती यंदा ९५ डेसीबलपर्यंत खाली आली आहे. यामुळे फारसा फरक पडला नसला तरी ठाणेकर नागरिक जागरुक होत असल्याचे दिसत आहे. शहरातील नौपाडा, गोखले रोड, राममारुती रोड आदी परिसरात फटाके फोडण्याचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाले आहे. त्याचवेळी पाचपाखाडी, वर्तकनगर आणि शहरातील काही भागांमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे.
ठाणे महापालिकेच्या कोपरी प्रदूषण नियंत्रण कक्षाने दिलेल्या अहवालानुसारच मागील चार दिवसांत फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता कमी आढळून आली आहे. मागील चार दिवसांच्या डेसीबल्सवर नजर टाकल्यास काही भागात हे प्रमाण २५ डेसीबल्सपर्यंत कमी आले आहे. याचे मुख्य कारण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फटाके फोडण्याचे प्रमाण हे तब्बल ३० टक्क्यांनी कमी झाले असल्याचा दावा आहे. ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमी होत असतांना वायुप्रदूषणाचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही.
ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रमुख मनिषा प्रधान यांनी सांगितले की, यंदा फटाके फोडण्याचे प्रमाण जरी कमी झाले असली तरी हवेत असलेल्या थंडाव्यामुळे वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. थंड हवामानात फटाक्यांचा धूर अधिक दाटून राहतो आणि तो हवेत चिकटून राहतो. त्यामुळेच वायुप्रदूषण वाढले आहे.
>वायुप्रदूषणात वाढ
दिवाळीपूर्वी १६ आॅक्टोबर रोजी प्रदूषण विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्व्हेत हवेत सल्फरडाय आॅक्साइडची मात्र ही २५ अंश होती तर नायट्रोजनडाय आॅक्साइडची मात्रा ३८ अंश होती. दिवाळीच्या काळात हवेतील प्रदूषण वाढल्याने सल्फरडाय आॅक्साइडची मात्रा ३८ अंशापर्यंत वाढली, तर नायट्रोजनडाय आॅक्साइडची मात्रा ५९ अंशापर्यंत वाढल्याचे निदर्शनास आले.