आभासी चलनप्रकरणी ठाणे-विक्रोळीत धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:51 IST2018-06-07T00:51:07+5:302018-06-07T00:51:07+5:30
आभासी चलन (क्रिप्टो करन्सी) प्रकरणी ठाणे पोलिसांनी बुधवारी ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ‘बिझनेस ओरियन्ट पार्क’ येथे पहिल्या मजल्यावरील तसेच विक्रोळीतील ‘फ्लिनस्टोन ग्रुप’च्या कार्यालयात धाडसत्र राबविले.

आभासी चलनप्रकरणी ठाणे-विक्रोळीत धाडसत्र
ठाणे : आभासी चलन (क्रिप्टो करन्सी) प्रकरणी ठाणे पोलिसांनी बुधवारी ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ‘बिझनेस ओरियन्ट पार्क’ येथे पहिल्या मजल्यावरील तसेच विक्रोळीतील ‘फ्लिनस्टोन ग्रुप’च्या कार्यालयात धाडसत्र राबविले. या दोन्ही कार्यालयांमधून काही महत्त्वाचे दस्ताऐवज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गुंतवणुकीचे अमिष दाखवून हजारो गुंतवणकदारांची फसवणूक केली असून हा आकडा शेकडो कोटींमध्ये वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. आतापर्यंत केवळ दोघेच तक्रारदार पुढे आले असल्यामुळे फसवणूक झालेल्यांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
याप्रकरणात तहा हाफीझ काझी (२६, कौसा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ ने अटक केली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. या पथकांनी नवी मुंबई परिसरात बुधवारी मुख्य सूत्रधार अमित लखनपाल तसेच त्याचे साथीदार सचिन शेलार, विक्रम भंगेरा आणि कोमल शिरसाठ आदींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण यांच्यापैकी कोणीही या पथकाच्या हाती लागले नाही.
आभासी चलनामध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल, असे सांगून दिल्लीतील प्रविण अग्रवाल आणि रोहित जैर यांच्याकडून अमित लखनपाल याच्या टोळीने ‘एमटीसी’ या आभासी चलनामध्ये एक कोटी ७६ लाख २६ हजारांची गुंतवणूक केली. त्यांना जादा परतावा मिळाला नाही. यात अडीच हजार लोकांची किमान ५०० कोटींपेक्षा अधिक फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी सध्या याप्रकरणात केवळ एक तक्रार दाखल आहे.