ठाण्यात चाकूच्या धाकावर दुकानातून मोबाइलची जबरी चोरी करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 20:59 IST2020-09-27T20:53:27+5:302020-09-27T20:59:06+5:30
मुक्ताईनगर भागातील एका दुकानात तोडफोड करीत चाकूच्या धाकावर मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्या हर्षल राम मोहिते (२४) या सराईत गुन्हेगाराला शनिवारी राबोडी पोलिसांनी अटक केली. हर्षल याच्याविरुद्ध खूनाच्या प्रयत्नासह अनेक गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

चाकूसह मोबाइल हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: माजीवडा येथील मुक्ताईनगर भागातील एका दुकानात तोडफोड करीत चाकूच्या धाकावर मोबाइलची जबरी चोरी करणाºया हर्षल राम मोहिते (२४) या सराईत गुन्हेगाराला शनिवारी राबोडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून जबरी चोरीतील मोबाइल आणि चाकूही हस्तगत करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर परिसरातील रहिवाशी सतीश वाघधरे (२६) यांच्या दुकानात २५ सप्टेबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्याच परिसरातील हर्षल मोहिते याने शिरकाव केला होता. त्याने दुकानाची तोडफोड करून चाकूचा धाक दाखवित ठार मारण्याची धमकी देत वाघधरे यांचा मोबाइल हिसकावून नेला होता. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस नाईक केशव धापशी आणि पोलीस कॉन्स्टेबल हेमंत खडसरे आदींच्या पथकाने मिळालेल्या वर्णनाच्या आधारे हर्षल या सराईत गुन्हेगाराला २६ सप्टेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. हर्षल याच्याविरुद्ध खूनाच्या प्रयत्नासह अनेक गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनावणे हे अधिक तपास करीत आहेत.