मुंबई नाही, तर ठाणे शहर आणि जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यावरील पाणी घरांमध्ये घुसले आहे. हा व्हिडीओ ठाणे शहरातील आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ बघून तुम्हालाही साचलेल्या पाण्यातून चालण्याची भीती वाटेल. साचलेल्या पाण्यातून साप वेगाने पोहताना दिसत आहे.
मुंबई आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या पावसाचे भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. ठाणे शहर आणि परिसरातही अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी घरांमध्ये सोसायट्यांमध्येही पाणी शिरले आहे.
रस्त्यावरच्या पाण्यात साप
ठाण्याच्या पूर्वेस असलेल्या देघरमध्ये अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला असून, अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये घुसले आहे. तर ठाण्यातील माजीवाडा लोढा कॉम्प्लेक्समध्ये पाण्यात साप दिसला. रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात साप दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाणे शहर आणि जिल्ह्याला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात संततधार कायम असून, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे.
महापालिकेकडून ठिकठिकाणी पाण्याचा उपसा केला जात आहे. अनेक ठिकाण रस्त्यावर पाणी साचल्यामुळे पर्यायी मार्गावरूनही वाहतूक वळवण्यात आली आहे.