- नितीन पंडितभिवंडी - आमच्या शेठला मुलगा झाला असुन सेठ पैसे वाटप करीत आहे, अशी बतावणी करून महिलेचे दागिने लुटणा-या आरोपीस शांतीनगर पोलिसांनी शिताफीने तपास करून छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली असल्याची माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.मोहमद इम्रान मोहमद अमीन अंसारी वय ४० वर्षे रा, रा.किराडपुरा, छत्रपती संभाजी नगर असे अटक आरोपीचे नाव आहे.
३० एप्रिल रोजी पाच वाजताच्या सुमारास ८५ वर्षीय वृध्द महिला सरफुन्निसा मो.समी चौधरी या रावजी नगर येथील घरी जात असताना रस्त्यात उभ्या असलेल्या भामट्या अज्ञात व्यक्तीने महिलेस थांबवून आमच्या शेठला मुलगा झाला असून तो गरिबांना पैसे वाटत आहे,तुम्हाला सुध्दा तो पैसे देईल त्यासाठी तुमच्या हातातील बांगड्या काढून ठेवा असे सांगत महिलेच्या हातातील तीन तोळे वजनाच्या १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या बांगड्या काढून रुमालात बांधून फसवणूक करीत बांगड्या घेऊन पसार झाला.या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकातील संतोष पवार,किरण जाधव, श्रीकांत पाटील,नरसिंह क्षीरसागर, रविंद्र पाटील,रोशन जाधव,तौफिक शिकलगार, विजय ताटे करत असताना सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे संशयिताला हेरले व त्याबाबत परिसरात चौकशी केली असता तो छत्रपती संभाजीनगर येथे राहत असल्याचे समजल्यावर पोलिस पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून संशयित आरोपीस ताब्यात घेत त्याच्या जवळ चोरी केलेल्या तिन्ही सोन्याच्या बांगड्या आढळून आल्या.पोलिसांनी त्यास अटक केली असून भिवंडी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.त्याने अजून काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.