ठाणे : ठाणे जिल्ह्यासह पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये लसींचा तुटवडा झाल्याने १ मेपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला पुरती खीळ बसली आहे. मागील दोन दिवसांत १८ ते ४४ वयोगटातील केवळ ५०१४ जणांचे लसीकरण केल्याची माहिती समोर आली आहे. वास्तविक यापूर्वी प्रत्येक महापालिकेत रोज ५ ते ८ हजार लोकांचे लसीकरण होत होते. नव्याने लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने या मोहिमेला खीळ बसणार असल्याचे दिसत आहे.
केंद्राने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले आहे. परंतु राज्याला केवळ ३ लाखांचाच साठा या मोहिमेसाठी मिळाला होता. त्याचे वाटप केल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या वाट्याला केवळ २० हजार लसींचा साठा आला होता. त्याचे वाटप केल्यानंतर प्रत्येक महापालिकेला १ ते २ हजार लसींचाच साठा मिळाला. रायगड आणि पालघरलादेखील तुटपुंजा साठा मिळाल्याने किती केंद्रे सुरू ठेवायची, किती बंद करायची, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करतांना इतर नागरिकांच्या लसीकरणाचे काय करायचे, त्यांना लस कशी द्यायची असा पेच शासकीय यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे.
मागील दोन दिवसांत ठाण्यासह रायगड आणि पालघरमध्ये अवघे ५ हजार १४ जणांचे लसीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये केवळ १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचाच समावेश आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी १९८६, तर दुसऱ्या दिवशी ३०२८ जणांचेच लसीकरण करण्यात आले आहे.
.............
झालेले लसीकरण
ठाणे ग्रामीण - ११७
कल्याण-डोंबिवली - ४७६
उल्हासनगर - २९०
भिवंडी - ३२९
ठाणे - ५५७
मीरा भाईंदर - ८२७
नवी मुंबई - ५१४
---------------
एकूण - ३११०
-----------------
पालघर ग्रामीण - ३००
पालघर शहर -४००
---------------
एकूण - ७००
---------------
रायगड ग्रामीण - ४१६
पनवेल महापालिका - ७८९
-----------
एकूण - १२०५