Thane: २५ लाखाच्या खंडणीसाठी नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या
By पंकज पाटील | Updated: March 25, 2024 20:23 IST2024-03-25T20:23:00+5:302024-03-25T20:23:13+5:30
Thane Crime News: एका नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बदलापूर जवळील गोरेगाव येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Thane: २५ लाखाच्या खंडणीसाठी नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या
- पंकज पाटील
बदलापूर - एका नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बदलापूर जवळील गोरेगाव येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
गोरेगाव येथे राहणारे मुदासिर बुबेरे यांचा इबाद (९) हा इयत्ता ४ थी शिकणारा मुलगा रमजानचा महिना सुरु असल्याने रविवारी संध्याकाळी नमाज अदा करण्यासाठी गेला होता. मात्र रात्री ९ वाजले तरी इबाद घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरु केली. या दरम्यान इबादच्या पालकांना एक निनावी फोन येऊन 25 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली.
घाबरलेल्या इबादच्या पालकांनी याबाबत कुळगांव ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ठाणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तातडीने गोरेगावात धाव घेतली. पोलिसांनी या परिसरात रात्री उशीर पर्यंत तपास केला. यावेळी पोलिसांना शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांच्या घरामागच्या बाजूला असलेल्या एका पोत्यात इबादचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून काही जणांना ताब्यातही घेतले आहे. तर इबादचा मृतदेह शविच्छेदनासाठी जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती स्वामी यांनी दिली. -