कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 07:20 IST2025-05-20T07:19:07+5:302025-05-20T07:20:26+5:30
ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
ठाणे: हॉंगकाँग आणि सिंगापूर या देशांत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. तसेच मुंबईतही दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला. ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरण कक्ष सज्ज ठेवला आहे. त्याबरोबर पुरेसा औषधसाठा, डॉक्टरांसह इतर पथकेही सज्ज आहेत. कोरोनाच्या रुग्णामध्ये ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळतात. तसे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून तपासणी करण्याच्या सूचना केंद्राच्या आरोग्य विभागातर्फे सर्व पालिकांना यापूर्वीच दिल्या आहेत. कळवा येथील ठामपाच्या रुग्णालयात कोरोनाचा धोका लक्षात घेता विशेष कक्ष तयार केला आहे. यामुळे यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
अतिदक्षता विभागासह १९ बेडची उपलब्धता
कळव्यातील रुग्णालयात १९ बेड सज्ज ठेवले. त्यातील १५ साधे, तर चार अतिदक्षता विभागाचे बेड आहेत. डॉक्टर आणि परिचारिका यांची पथके तयार ठेवली आहेत. याठिकाणी रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी. खोकला, ताप आदी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. याआधी मार्च २०२० मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने मोठी घबराट पसरली होती. ठाणे महापालिका क्षेत्रात दोन लाख ३०५ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यात एक लाख ९८ हजार ४५ जणांनी कोरोनावर मात केली होती.