TMC Budget 2022: ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प फुटला? रदद् करण्याची राष्ट्रवादी आणि काँग्रेस नगरसेवकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:55 IST2022-02-10T15:55:18+5:302022-02-10T15:55:38+5:30
ठाणे महापालिकेच्या बजेट सेशनमध्ये गोंधळ झाला आहे. अर्थसंकल्प हा अत्यंत गोपनीय दस्तावेज असून तो सादर होण्यापूर्वीच वृत्तपत्रामध्ये कसा छापला गेला, याची चौकशी झालीच पाहीजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

TMC Budget 2022: ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प फुटला? रदद् करण्याची राष्ट्रवादी आणि काँग्रेस नगरसेवकांची मागणी
ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होत असताना काँग्रेसचे नगरसेवक विक्रम चव्हाण यांनी प्रशासनाचा निषेध करत हा अर्थसंकल्प रद्द करण्याची मागणी केली. स्थायी समिती सदस्यांना अर्थसंकल्पाची कॉपी न देता ती थेट वृत्तपत्रांना कशी मिळाली, असा परखड सवाल विक्रम चव्हाण यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना केला.
अर्थसंकल्प हा अत्यंत गोपनीय दस्तावेज असून तो सादर होण्यापूर्वीच वृत्तपत्रामध्ये कसा छापला गेला, याची चौकशी झालीच पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली. अर्थसंकल्पाची प्रत नगरसेवकांना देण्याची प्रथा असताना ती थेट वृत्तपत्राला देण्यात आल्याने संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली.
अर्थसंकल्पाची प्रत आम्हाला दिली असती तर त्याचा अभ्यास करून आम्ही त्यावर आक्षेप घेतला असता, यासाठीच ती आम्हाला देण्यात आली नाही, असा आरोप यावेळी विरोधकांनी केला. प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर टीका करत काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई या दरम्यान सभात्याग केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष राज्य सरकारमध्ये सहभागी असल्याने ठाणे महानगरपालिकेचा सदर अर्थसंकल्प रद्द करावा अशी मागणी आपण आपल्या वरीष्ठ नेत्यांकडे केली असल्याचं दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी सांगितले आहे.