ठाणे ही "सुरेलनगरी" : पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: April 27, 2025 18:47 IST2025-04-27T18:47:05+5:302025-04-27T18:47:20+5:30
भारतात पहिल्यांदा १ली ते १० वीचा बासरीवादनाचा अभ्यासक्रम सुरु

ठाणे ही "सुरेलनगरी" : पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया
ठाणे: 'ठाणे ही सुरेल नगरी आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक बासरीवादक ठाण्यात आहेत. माझा ज्येष्ठ शिष्य विवेक सोनार याच्या मार्गदर्शनाखाली दिवसेंदिवस ही संख्या वाढतेय याचा आनंद होतो.' असे उद्गार पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे उद्गार यांनी काढले. रविवारी ठाण्यातील गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित 'स्वर प्रभात' या कार्यक्रमात ते बोलत होते. विवेक सोनार लिखित भारतातील बासरी वादनाचे पहिलेच इयत्ता १ ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण देखील पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे हस्ते झाले. या पुस्तकाचा अंतर्भाव नवीन शैक्षणिक वर्षापासून प्रथम पश्चिम बंगालच्या शंभर शाळांमध्ये होणार आहे. नंतर देशभरात याचा विस्तार होणार असल्याचेही पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी सांगितले.
रसिकप्रेमींसाठी ठाण्यात 'स्वर प्रभात' कार्यक्रमाचे दुसरे पर्व पार पडले. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत़े. ज्येष्ठ गायक पंडित सुरेश बापट व पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शास्त्रीय गायन व सामूहिक बासरी वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. अभिजात संगीतात विविध उपक्रम राबवणारी अग्रगण्य संस्था गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे ठाण्यातील टाऊन हॉल अॅम्पिथिएटर येथे 'स्वर प्रभात' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी २७ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता हा कार्यक्रम रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बासरी वादक पंडित विवेक सोनार यांच्या युवराज सोनार, डॉ. हिमांशू गिंडे, प्रशांत बानिया, सतेज करंदीकर आणि रितेश भालेराव या ज्येष्ठ शिष्यांनी राग अहीर भैरव सादर करत सुरेल सुरूवात केली. रोहित देव याने त्यांना तबला साथ केली.
ठाण्यातील ज्येष्ठ गायक पंडित सुरेश बापट यांच्या शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी राग कोमल रिषभ आसावरी आणि ललित रागातील बंदीश मोहंमद रसूल नूर भरपूर सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यावेळी हार्मोनियम साथ अनंत जोशी, तर तबला साथ सुहास चितळे यांनी केली. युनियन बँकेचे श्रीयुत भाटिया, ठाणे उपायुक्त दिनेश तायडे, पंडित सुरेश बापट, रवी नवले, कविता सोनार आणि पंडित विवेक सोनार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. या कार्यक्रमात ठाण्याचा साईराज नवले, जळगावचा अजय सोनावणे, कोलकात्याचे सोहांग डे, अनीष पाल, सोलापूरचा मयुरेश जाधव, मुंबईची खुषी चौगुले, आणि चाळीसगावचे युवराज सोनार सिद्धेश खैरनार या भारतातील आठ संगीत साधक विद्यार्थ्यांना एकूण पाच लाखांची शिष्यवृत्ती देण्यात आली.
ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी, '' शास्त्रीय संगीतासाठी इतकं मोठं काम होत आहे. मी विवेकचा सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. अशा चळवळींचा ठाणे महानगरपालिका नेहमीच मदत करत राहील. कलाकारांच्या पाठिशी उभी राहील,''अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गायिका उत्तरा चौसाळकर, निषाद बाक्रे, कथ्थक नृत्यांगना मुक्त जोशी असे दिग्गज मंडळी उपस्थित होते.कार्यक्रमात प्रवीण कदम यांची मोलाची मदत झाली.