ठाणे : ठाणे महापालिकेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या खैरातीला यंदा विधानसभा निवडणूक आचारसंहितेचा ब्रेक लागला आहे. त्यामुळे वर्धापन दिनानिमित्त केवळ महापालिकेचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून इतर कार्यक्रम होणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.ठाणे महापालिकेचा ३७ वा वर्धापन दिन १ आॅक्टोबर रोजी गडकरी रंगायतन येथे साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. यावेळी केवळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रमच घेतला जाणार आहे.दरवर्षी वर्धापन दिनाच्या निमित्ताने होणाºया पुरस्कारांच्या खैरातीला यावेळी ब्रेक लागला आहे. दरवर्षी वर्धापन दिनाच्यानिमित्ताने एखाद्या नगरसेवकाला हाताशी घेऊन किंवा आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांचे मन राखण्यासाठी त्यांच्या जवळच्याला ठाणेभूषण, ठाणे गुणीजन आदींसह इतर १५० हून अधिक पुरस्कारांची खैरात दिली जात होती.मागील वर्षी महापौरांनी या खैरातीवर काही निर्बंध आणल्याने या पुरस्कारांची संख्या कमी झाली होती. असे असले तरी यंदाहीअनेकांनी आपल्या मर्जीतील पदाधिकाºयाला किंवा त्याच्या नातेवाइकाला पुरस्कार मिळावा, यासाठी तयारी केली होती.यासाठी काहींनी नगरसेवकांचे पत्रही मिळविले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि या सर्वांच्याच आनंदावर विरजण पडले आहे.
ठाणे गुणीजन, भूषण पुरस्कारांना ब्रेक, निवडणूक आचारसंहितेची अडचण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 01:46 IST