ठाणे/उल्हासनगर - महिनाभर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाणेकरांना पहिल्याच सामन्यात पावसाने सेंच्युरी (१५०.८८ मिमी) ठोकून सुखद धक्का दिला. एकीकडे पावसाच्या आगमनामुळे सर्वसामान्य सुखावले असताना, दुसरीकडे संततधार पावसाने उल्हासनगरातील नालेसफाईची पोलखोल होऊन फर्निचर मार्केटमधील नाला तुंबल्याने दुथडी भरून वाहू लागला आणि फर्निचर मार्केटला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. नाल्यातील पाणी अनेक दुकानांत शिरल्याने लाखो रुपयांच्या फर्निचरचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून परिसरातील विद्युतपुरवठा खंडित केल्याने १८०० घरांमधील नागरिकांना अंधारात राहावे लागले. सेंच्युरी शाळेजवळ वीज पडून गजेंद्र गोद्रा हा जखमी झाला.रस्ते व पुलांच्या अर्धवट अवस्थेत राहिलेल्या कामांमुळे मुरबाड व शहापूर तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी साचून १५ गावे आणि २० आदिवासीवाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला. तर, ठाणे शहरात १२, तर कल्याण-डोंबिवली परिसरात १३ वृक्ष उन्मळून पडले. पहाटेपासून पावसाने जोर धरल्याने मध्य रेल्वेची उपनगरी वाहतूक सकाळपासून १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती. परिणामी, सकाळी व सायंकाळी गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल झाले.पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा बोजवारा उडण्याचे भाकीत सोशल मीडियावर नागरिकांनी व्यक्त केले होते. त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी पावसाने नाले व गटारे ओव्हरफ्लो होऊन फर्निचर मार्केट बुडाल्याने आले. तेथून वाहणारा नाला रात्री तुंबल्याने, त्यातील पाणी रस्त्यावरून वाहू लागले. फर्निचर मार्केट व कॅम्प नं.-१ परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवला. मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी जेसीबीद्वारे नाल्यावरील स्लॅब तोडून नाल्याचा मार्ग मोकळा केल्यानंतर फर्निचर मार्केटमधील पाण्याचा निचरा झाला. फर्निचर मार्केटसह, गुलशननगर, कॅम्प नं.-३, स्टेट बँकेसमोरील मुख्य रस्ता, मयूर हॉटेल, शहाड स्टेशन परिसर यांच्यासह अनेक भागांत पाणी साचून तलावाचे स्वरूप आले होते. सेंच्युरी शाळेची संरक्षक भिंत पडली असून तेथील एका झाडावर वीज पडून झाडाखाली उभा असलेला गजेंद्र गोद्रा हा जखमी झाला. त्याच्यावर सेंच्युरी कंपनीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पहिल्याच सामन्यात पावसाची ‘सेंच्युरी’, रेल्वे कूर्मगतीने, वीजपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 01:24 IST