नेत्रदानामध्ये ठाणे जिल्ह्याची कामगिरी अंधकारमय; गैरसमज, सरकारच्या उदासीनतेचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 07:52 IST2025-09-05T07:52:26+5:302025-09-05T07:52:53+5:30
देशपातळीवर गेल्यावर्षी ५१ हजार २४९ नेत्रदान झाले, त्यातील २७ हजार ५५९ बुबुळांचाच उपयोग झाला.

नेत्रदानामध्ये ठाणे जिल्ह्याची कामगिरी अंधकारमय; गैरसमज, सरकारच्या उदासीनतेचा परिणाम
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - रक्तदानाला जेवढा सकारात्मक प्रतिसाद मिळतो तेवढे गांभीर्याने नेत्रदानाकडे पाहिले जात नसल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट दिसते. गेल्यावर्षी ठाण्यात केवळ ६२० नेत्रदान झाले. त्यातील ४८८ बुबुळांचा वापर झाला. सहियारा नेत्रपेढीने ही माहिती दिली. राज्य व देश पातळीवरही अशी उदासीनता असल्याचा दावा नेत्रपेढीने केला.
‘डोळे द्या, अंधार नाहीसा करा’ असे आवाहन सहियारा नेत्रपेढी करते. महाराष्ट्रासह देशभरात दरवर्षी दीड ते दोन लाख नेत्रांची गरज असते. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात केवळ दोन हजार ४९७ नेत्रदान झाले, त्यापैकी एक हजार ५२४ बुबुळांचा वापर केला. देशपातळीवर गेल्यावर्षी ५१ हजार २४९ नेत्रदान झाले, त्यातील २७ हजार ५५९ बुबुळांचाच उपयोग झाला.
...तर २४ तासांतही नेत्रदान शक्य
‘लोकांना वाटते की, मृत व्यक्तीचा पूर्ण डोळा काढला जातो, पुढच्या जन्मी अंधत्व येते. मृत्यूनंतर ६ ते ८ तासांच्या आत नेत्रदानाची प्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेला केवळ अर्धा तास अवधी लागतो. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत मृतदेह बर्फात ठेवला, तर २४ तासांतही नेत्रदान शक्य आहे, असे सहियारा नेत्रपेढीच्या व्यवस्थापिका सुप्रिया हिरवे यांनी सांगितले.
‘नेत्रदानासाठी जनजागृती ही फक्त कागदोपत्री राहिली आहे. मृत्युप्रमाणपत्रावर नेत्रदानाची चौकट असली तरी सरकारी- खासगी रुग्णालयांत कर्मचारी हे व्यक्तीच्या कुटुंबीयांना नेत्रदानाविषयी प्रोत्साहित करीत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. शासनानेच गांभीर्याने पुढाकार घेतला नाही, तरच नेत्रदानाचे प्रमाण वाढणार नाही. दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा कालावधी ‘नेत्रदान पंधरवडा’ म्हणून साजरा केला जातो. मात्र, या १५ दिवसांत सरकारकडून प्रत्यक्षात किती जनजागृती होते याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
जीवनदायी देणगी
अंधकारमय जीवन जगणाऱ्या लाखो लोकांना दृष्टी देण्याची संधी वाया जाऊ नये, यासाठी आता सरकारने आणि समाजानेही नेत्रदानाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. नेत्रदानाची प्रक्रिया ना जटिल आहे ना वेळखाऊ, उलट ती एका अंध व्यक्तीला नवीन दृष्टी देणारी जीवनदायी देणगी ठरते, असा विश्वास हिरवे यांनी व्यक्त केला.