ठाणे जि.प. पं. समिती निवडणुकीची मतदार यादी नसल्याची अफवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 18:53 IST2017-11-25T18:53:17+5:302017-11-25T18:53:25+5:30
ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) ५३ गट व पाच पंचायत समित्यांच्या (पं. स.)१०६ गणांसाठी इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र मागवण्यात आले आहेत. पण मतदार यादी आॅनलाइन प्रसिद्ध झाली नसल्याची अफवा ठाणे जिल्हह्यात ग्रामीण भागात पसरली आहे.

ठाणे जि.प. पं. समिती निवडणुकीची मतदार यादी नसल्याची अफवा
सुरेश लोखंडे/ ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) ५३ गट व पाच पंचायत समित्यांच्या (पं. स.)१०६ गणांसाठी इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र मागवण्यात आले आहेत. पण मतदार यादी आॅनलाइन प्रसिद्ध झाली नसल्याची अफवा ठाणे जिल्हह्यात ग्रामीण भागात पसरली आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जात आहे. या जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी १३ डिसेंबररोजी मतदान होणार आहे.
यासाठी सुमारे सात लाख मतदाराना मतदानाचा हक्क दिला आहे. या अंतिम मतदार याद्यादेखील प्रसिद्ध झाल्या आहेत. आॅक्टोबरच्या विधानसभेसाठी वापरलेल्या मतदार याद्या या निवडणुकीसाठी वापरण्यात येत आहेत. आॅनलाईन प्रसिद्धीसह प्रत्येक मतदार संघ निहाय या याद्या आवश्यक त्या दुरूस्तीसह २० नोव्हेबरला प्रसिद्ध केल्याचा दावा ठाणे उपजिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी करून गैरसमज व अफवा पसरवणे चुकेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निवडणुकांसाठी किनारपट्टी झोनसह डोंगरी व शहरी असे तीन झोन सोयी नुसार तयार करण्यात आले आहेत. यानुसार जि.प.चे ५३ गट व पाच पंचायत समित्यांच्या १०६ गणात निवडणुका घेतल्या जात आहेत. शुक्रवारच्या दुस-या दिवसापर्यंत मुरबाड तालुक्यातून जि.प.साठी केवळ दोन उमेदवारी अर्ज आले. २८ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. पण शहापूर तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य ठिकाणी मतदार याद्या आॅनलाइन प्रसिद्ध झाल्या नसल्याची अफवा पसरली आहे. यानुसार जिल्हाधिका-यांकडे तक्रारदेखील करण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु ही केवळ अफवा आहे. तालुक्यातील मतदार संघ निहाय मतदार याद्या प्रसिध्द झाल्या आहेत.
शहापूर तालुक्यात एक ते १४ क्रमांकाची मतदार यादी आहे. मुरबाडला १५ ते २२, कल्याणला २३ ते २८ भिवंडी तालुक्यात सर्वाधिक २९ ते ४९ आणि अंबरनाथ तालुक्यात ५० ते ५३ क्रमांकाची मतदार यांनी प्रसिद्ध झाल्याचे आढळून येत आहे. या याद्यामधील आॅनलाईन मतदार यादीतील नावावर टीक करून उमेदवारी दाखल होत आहे. याशिवाय अनुमोदन व सूचकांची नावे देखील यादीत टीक करून घेतली जात आहे. त्याशिवाय उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकत नसल्याचे गलांडे यांनी सांगितले.
उमेदवारास नव्याने बँक खाते उघडणे सक्तीचे आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून पाच बूक मिळण्यास विलंब होतो. उमेदवारांची ही समस्या दूर करण्यासाठी शेड्युलबँकेत खाते उघडण्याची सवलत देण्यात आली आहे. या बँकांमध्ये पाच बूक किंवा खाते उघडल्याचा काही तरी पुरावा त्वरीत मिळणे सहज शक्य असल्याचे सुतोवाच गलांडे यांनी केले. यामुळे खाते उघडण्याची अट जाचक म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात गाफील ठेवण्यासह वेळ मारून नेण्यासाठी अफवा व गैरसमज पसरवण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याकडे दुर्लक्ष करून वेळेत कामे उकरणे हिताचे असल्याचे जिल्हह्यातील काही राजकीय नेत्यांकडून संबंधीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे देखील ऐकायला मिळत आहे.