राजकीय पक्ष, कामगार संघटनांची ‘स्मार्ट प्रीपेड वीज मीटर’ विराेधी ठाणे जिल्हा समिती; उद्या महावितरण कार्यालयावर धडकणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 21:25 IST2025-01-05T21:25:04+5:302025-01-05T21:25:04+5:30
या समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते ६ जानेवारी राेजी अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी कार्यालय, वागळे येथे धडकणार

राजकीय पक्ष, कामगार संघटनांची ‘स्मार्ट प्रीपेड वीज मीटर’ विराेधी ठाणे जिल्हा समिती; उद्या महावितरण कार्यालयावर धडकणार!
सुरेश लोखंडे
ठाणे : येथील जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट, उध्दव सेना, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व धर्मराज्य पक्ष आणि ठाणे जिल्ह्यातील कार्यरत सर्व क्षेत्रातील कामगार संघटना, वीज कंपन्यातील कामगार संघटना यांची संयुक्त बैठक पार पडली. त्यामध्ये ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड एम. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘ जिल्हा स्मार्ट प्रीपेड वीज मीटर’ विराेधी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्ह्यातील प्रमुख सहा राजकीय पक्ष व ४५ कामगार संघटनांचा समावेश आहे. या समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते ६ जानेवारी राेजी अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी कार्यालय, वागळे येथे धडकणार
राज्यातील ‘वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर’ लावण्यात येणार नाही, ही घोषणा सध्याचे मुख्यमंत्री व तत्कालीन उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जुलैच्या पावसाळी अधिवेशनात केली हाेती. पण दिलेल्या आश्वासनाचे उल्लंघन करीत ठाणे जिल्ह्यासह राज्यात ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ लावण्याची कारवाई सुरू झाली आहे. सुरुवातीला फॉल्टीमीटर व नवीन वीज पुरवठ्या करीता स्मार्ट प्रीपेड मीटर अदानी कंपनीने बसविण्यात सुरुवात केलेली आहे.ही सामान्य जनतेची फसवणूक असल्याचा आराेप करून त्याविराेधात ठाणे जिल्हास्तरीय ‘स्मार्ट प्रीपेड विज मीटर’ विराेधी समिती गठीत करण्यात आली आहे.
सामान्य जनतेची फसवणूक सरकार अदानीच्या माध्यमाने करत असल्याचा आराेप या पक्षांच्या बैठकीत करण्यात आलला आहे. त्या विरोधात ठाण्यातील राजकीय पक्ष, कामगार संघटना व जन संघटना यांची ‘ठाणे जिल्हा स्मार्ट प्रीपेड विज मीटर विरोधी समितीची’ स्थापना करण्यात आली. या समितीने स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 'स्मार्ट प्रीपेड मीटर'मुळे वीज ग्राहक, वीज कर्मचारी,सामान्य जनता व वीज कंपन्या काम करणारे कंत्राटी व कायम (परमनंट) कर्मचारी यांच्यावर काय परिणाम होणार आहे. याबाबत विस्तृत मार्गदर्शन ‘कॉ. गिरीश भावे, कॉ. कृष्णा भोयर, कॉ. विश्वास उडगी, महाराष्ट्र आयटक चे उपाध्यक्ष कॉ. उदय चोधरी, धर्मराज्य पक्षाध्यक्ष राजन राजे, काॅ. एम. ए. पाटील, आत्माराम विशे, कॉ. लिलेश्वर बनसोड, राष्ट्रवादी ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई आदी वक्त्यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व राजकीय पक्षांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे जाहीर केले.
स्मार्ट प्रीपेड मीटर चे वीज ग्राहकावर होणारे परिणाम लोकांपर्यंत पोहोचण्याकरता लाखो पत्रके छापून जनतेपर्यंत वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला ६ जानेवारी रोजी अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी कार्यालय, वागळे येथे दुपारी १ वाजता सर्व राजकीय पक्ष, कामगार संघटना व वीज कामगार संयुक्त सभा घेऊन स्मार्ट प्रीपेड मीटरचा तीव्र विरोध करणार आहे. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व वीज ग्राहकाचा प्रचंड मोर्चा काढण्याचा निर्णय ठाणे जिल्हा स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.