ठाण्यातील चार बांग्लादेशी घुसखोर महिलांना न्यायालयाने सुनावली कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 21:32 IST2017-12-30T21:26:36+5:302017-12-30T21:32:15+5:30

अवैध मार्गांचा अवलंब करून भारतात आल्यानंतर ठाण्यातील काशीमिरा येथे बेकायदेशीर वास्तव्य केलेल्या चार बांग्लादेशी महिलांना न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षेनंतर महिलांना त्यांच्या देशात परत पाठविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

Thane Court sentenced four Bangladeshi intruders | ठाण्यातील चार बांग्लादेशी घुसखोर महिलांना न्यायालयाने सुनावली कारावासाची शिक्षा

ठाण्यातील चार बांग्लादेशी घुसखोर महिलांना न्यायालयाने सुनावली कारावासाची शिक्षा

ठळक मुद्देकाशीमिरा येथे केले होते अवैध वास्तव्यवर्षभरात न्यायालयाचा निकालशिक्षेनंतर मायदेशी परत पाठविण्याचे आदेश

ठाणे : घुसखोरी करून ठाण्यातील काशीमिरा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या चार बांग्लादेशी महिलांना ठाणे न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. वर्षाच्या सुरूवातीला ठाणे पोलिसांनी या महिलांना अटक केली होती.
२८ जानेवारी २0१७ रोजी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी काशीमिरा येथे धाड टाकून दोन बांग्लादेशी महिलांना अटक केली होती. ७ फेब्रुवारी २0१७ रोजी पोलिसांनी याच भागात दुसरी एक धाड टाकून आणखी दोन बांग्लादेशी महिलांना अटक केली. तदर्थ जिल्हा न्यायाधिश आणि सहायक सत्र न्यायाधिश आर.एस. पाटील (भोसले) यांच्यासमोर या दोन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी झाली. अ‍ॅड. विनित कुळकर्णी, उज्वला मोहोळकर आणि वंदना जाधव यांनी या प्रकरणांमध्ये सरकारची बाजु मांडली. जन्ना नुरइस्लाम शेख (वय ३५), शुकी हारूण मुल्ला (वय ५८), सिमा समथ मातबर (वय ३0) आणि मैना जुमत गाझी (वय ३0) ही आरोपी महिलांची नावे आहेत. या चारही महिला काशीमिरा येथे वास्तव्य करून मजुरी करायच्या. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा त्या अन्य मजुरांसोबत रोजंदारी घेण्यासाठी थांबलेल्या होत्या. पोलिसांना पाहताच त्यांनी पसार होण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सरकारी पक्षाने न्यायालयास दिली. त्यांच्याकडे वास्तव्याचा कोणताही अधिकृत पुरावा नसल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले. चारही आरोपी महिला असून, त्यांचे वय पाहता कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती आरोपींच्या वकिलांनी केली. मात्र सरकारी पक्षाने या विनंतीला विरोध केला. आरोपींनी भारतात घुसखोरी केली असून, अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आरोपींविषयी कोणतीही दयामाया न दाखविता जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती सरकारी पक्षाने केली. आरोपी महिला अतिशय गरिब आहेत. केवळ रोजगाराच्या उद्देशाने त्या भारतात आल्या. याशिवाय कोणत्याही अवैध कृत्यामध्ये त्यांचा सहभाग दिसलेला नसल्याने, त्या दयेस पात्र असल्याचे निरीक्षण नोंदवत, न्यायालयाने चारही महिलांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षा संपल्यानंतर आरोपींना त्यांच्या देशात परत पाठविण्यासाठी तत्काळ पाऊले उचलण्याचे आदेश न्यायालयाने नयानगर पोलीस आणि तुरूंग प्रशासनाला दिले.

Web Title: Thane Court sentenced four Bangladeshi intruders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.