In Thane, corona-infected patients are left at home without being tested, the mayor alleged | ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची चाचणी न करता घरी सोडण्याचे प्रकार, महापौरांनी केला आरोप

ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची चाचणी न करता घरी सोडण्याचे प्रकार, महापौरांनी केला आरोप

ठाणे : ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, ही बाब जरी ठाण्यासाठी समाधानकारक असली तरी देखील यातून आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. कोरोना बाधीत रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर सातव्या किंवा आठव्या दिवशी अशा रुग्णांना बरे वाटल्यानंतर तत्काळ घरी सोडले जात असल्याचा धक्कादायक आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. वास्तविक पाहता घरी सोडण्यापूर्वी रुग्णाची कोरोना चाचणी होणे गरजेचे असतांना तसे केले जात नसल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचे पत्र त्यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांना दिले आहे.
           ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ही १५४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी ११६ रुग्ण हे बरे झाले असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु या मागचे वास्तव आता समोर येत आहे. लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना सात ते आठ दिवसात बरे वाटू लागले. ताप येत नसल्यास त्यांची पुन्हा कोरोना चाचणी न करता त्यांना घरी सोडले जात असल्याची धक्कादायक समोर आली आहे. वास्तविक पाहता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात स्पष्ट सांगितले हो की इतर राज्याप्रमाणे किंवा केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार नाही तर जो पर्यंत कोरोना बाधीत रुग्ण पूर्णपणे बरा होत नाही, आणि त्याची पुन्हा कोरोना चाचणी निगेटीव्ह येत नाही, तो पर्यंत घरी सोडू नये असे सांगितले आहे. परंतु त्याकडेही येथील खाजगी रुग्णालयांनी दुर्लक्ष केल्याचे म्हस्के यांनी म्हंटले आहे. शहरात आजच्या घडीला झोपडपटटी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात अशा प्रकारे चाचणी न करता एखाद्याला घरी सोडले जात असेल आणि तो पूर्णपणे बरा झाला नसेल तर त्याच्या संपर्कातील इतरांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे ही देखील चिंतेची बाब असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले. त्यातही या रुग्णालयांकडे विचारणा केली असता आमच्याकडे तशा कोणत्याही स्वरुपाचे आदेश किंवा पत्र आलेले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वेळीच या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
 

Web Title: In Thane, corona-infected patients are left at home without being tested, the mayor alleged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.