अमृत शहरांमध्ये ठाणे शहर ठरले सर्वोत्तम; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 03:34 PM2021-06-05T15:34:30+5:302021-06-05T15:43:12+5:30

महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्वीकारला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पुरस्कार

Thane became the best city among the nectar cities; Online award at the hands of the CM | अमृत शहरांमध्ये ठाणे शहर ठरले सर्वोत्तम; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पुरस्कार

अमृत शहरांमध्ये ठाणे शहर ठरले सर्वोत्तम; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पुरस्कार

Next

ठाणे :  माझी वसुंधरा अभियानातंर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून सन 2020-21 मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी सबंधित पंचतत्वावर आधारित घेण्यात आलेल्या स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेने प्रथम स्थान पटकावले. शहराचे प्रथम नागरिक महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी ॲानलाईनद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

या  स्पर्धेत 43 शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यामधीन  अमृत शहरांच्या गटामध्ये ठाणे महापालिकेला सर्वोत्तम कामगिरी करणारे शहर म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात  ऑनलाईन पध्दतीने पार पडलेल्या या कार्यक्रमास महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त 1 गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, उपनगरअभियंता अर्जुन अहिरे, प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड, महापालिका कर्मचारी उपस्थियत होते. ऑनलाईन पध्दतीने ठाणे महापालिकेस प्रथम क्रमांक जाहीर होताच महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाचे कौतुक करुन अभिनंदन केले. तसेच महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी देखील प्रदुषण नियंत्रण विभागाचे व महापालिकेने राबविलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले.
 
5 जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज या पुरस्काराची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, माझी वसुंधरा अभियान संचालयानाच्या वतीने करण्यात आली. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार,  पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैस्कर व महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदा व महानगरपालिका या ऑनलाईन पध्दतीने कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

माझी वसुंधरा अभियानातंर्गत अमृत शहरे, नगरपालिका, नगरपरिषदा व पंचायत या एकूण 686 संस्थांमध्ये स्पर्धा झाली. भूमी, जल, वायू, अग्नि, आकाश या पंचत्तवामध्ये दिनांक 1 जानेवारी 2020 ते 15 एप्रिल 2021 या कालावधीमध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यात आले. वृक्षलागवड, जलसंवर्धन, हवाप्रदुषण नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन, उर्जाबचत व पर्यावरणबाबत जनजागृती याबाबतच्या कामांचे मूल्यमापन करुन ते ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून शासनाला सादर करण्यात आले होते. यामध्ये ठाणे महानगरपालिकेची सर्वोत्तम 10 शहरांमध्ये निवड झाली होती. पुन्हा शासनाच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने महापालिकेने केलेल्या कामांचे मूल्यांकन करण्यात आले. या दोन्ही टप्प्यात ठाणे महापालिकेची कामगिरी अव्वल ठरली व अमृत सिटी म्हणून ठाणे महापालिकेस प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. तर द्वितीय क्रमांक नवीमुंबई महानगरपालिका, तृतीय क्रमांक बृहन्मुंबई महानगरपालिका यांना तर प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक पुणे महापालिकेला तर  द्वितीय उत्तेजनार्थ  परितोषिक विभागून बार्शी व नाशिक महानगरपालिका यांना  देण्यात आले. यावेळी ठाणे महापालिकेच्या प्रदुष्ण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान व त्यांच्या संपूर्ण टीमचे महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याहस्ते अभिनंदन करण्यात आले.

Web Title: Thane became the best city among the nectar cities; Online award at the hands of the CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.