ठाणे : पूर्ववैमनस्यातून वाहन चालक तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला

By जितेंद्र कालेकर | Updated: February 3, 2023 19:08 IST2023-02-03T19:07:22+5:302023-02-03T19:08:38+5:30

कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा: दाेघे आराेपी पसार.

Thane A young driver was attacked with an iron rod out of animosity | ठाणे : पूर्ववैमनस्यातून वाहन चालक तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला

ठाणे : पूर्ववैमनस्यातून वाहन चालक तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला

ठाणे : पूर्ववैमनस्यातून सत्यवान खेडेकर (३२, रा. किसननगर, ठाणे) या वाहन चालकावर दोघांनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली. विक्रांत ऊर्फ गांधी याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी दिली.

किसननगर येथील रहिवासी सत्यवान याचे १ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट येथील ज्ञानेश्वरनगर डॉ. आंबेडकर चौक याठिकाणी काही मुलांसोबत भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून २ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड, भाईंदरपाडा येथील जीआरआय प्रॉपर्टीजच्या बाजूच्या मोकळ्या जागेमध्ये विक्रांत ऊर्फ गांधी याने सत्यवानला शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच ओंकार भोसले याने त्याच्या डोक्यात, पाठीवर आणि उजव्या हाताच्या दंडावर लोखंडी रॉडने मारून त्याला गंभीर जखमी केले.

या हल्ल्यात जखमी झालेल्या सत्यवान याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, कासारवडवली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील विक्रांत आणि ओंकार हे दाेघेही पसार झाले असून, त्यांचा शाेध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी सांगितले.

Web Title: Thane A young driver was attacked with an iron rod out of animosity