ठाण्यात सलून आणि ब्युटीपार्लर व्यावसायिकांसह ४०० कर्मचाऱ्यांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST2021-06-29T04:26:54+5:302021-06-29T04:26:54+5:30
ठाणे : सलून, ब्युटीपार्लर असोसिएशन महाराष्ट्रच्या ठाणे विभागातर्फे सोमवारी ठाणे पूर्व येथील मंगला हायस्कूल येथे सलून आणि ब्युटीपार्लर व्यावसायिक ...

ठाण्यात सलून आणि ब्युटीपार्लर व्यावसायिकांसह ४०० कर्मचाऱ्यांनी घेतली लस
ठाणे : सलून, ब्युटीपार्लर असोसिएशन महाराष्ट्रच्या ठाणे विभागातर्फे सोमवारी ठाणे पूर्व येथील मंगला हायस्कूल येथे सलून आणि ब्युटीपार्लर व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांसाठी मोफत लसीकरण शिबिर आयोजिले होते. यावेळी ४०० व्यावसायिक आणि कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. या शिबिराला ठाणे महापौर नरेश म्हस्के यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.
सलून आणि ब्युटीपार्लर व्यावसायिक, कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाकडे शासनाकडून दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे असोसिएशनने पुढाकार घेऊन लवकरात लवकर लसीकरण होण्याच्यादृष्टीने सोमवारी सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित केले असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यात १८ ते ४४ वयोगटातील व्यावसायिक, कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. या शिबिराला एका खासगी कंपनीचे सहकार्य लाभले. एक आठवडाभर असोसिएशनने नोंदणी करून लस देण्यात आली. रुशिल मोरे, मंदार राऊत, संदीप जाधव यांसारख्या पदाधिकाऱ्यांनी आयोजनाचे काम पाहिले. लस घेतल्यानंतर त्यांना पाणी, ज्यूस, बिस्किटे आणि मास्कचेदेखील वाटप केले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, ठाणे जिल्हा अध्यक्ष रमेश चव्हाण, महाराष्ट्र सलून असोसिएशनचे सल्लागार उदय टक्के व इतर उपस्थित होते.
गेल्या वर्षभरापासून या क्षेत्रातील व्यावसायिक वीज बिल आणि बँकांचे हप्ते यावर लावण्यात आलेली व्याजाची रक्कम कमी करावी यासाठी सरकारकडे मागणी करत आहे. परंतु, सरकार कोणतेही सहकार्य न दाखवता उलट नाभिक समाजाची आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांची गळचेपी करीत आहे. सरकारला वीज बिल कमी करणे सहज शक्य आहे. पण त्यांना ते करायचे नाहीये. सरकार लॉकडाऊनचे निर्बंध लावताना दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देते. परंतु, प्रत्यक्षात या नियमांना पायदळी तुडवून दुपारी ४ वाजल्यानंतरही दुकाने सुरू असतात, अशा भावना टक्के यांनी यावेळी व्यक्त केल्या.
-----------------
संपूर्ण महाराष्ट्रात या क्षेत्रात ३५ लाख लोक आहेत आणि त्यांच्यावर त्यांचे कुटुंबीय आधारित आहेत. ही संख्या पाहिली, तर ती करोडोंच्या आसपास जाते. इतक्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
------------------