दंडाची पावती मिळताच ३११ तळीरामांची उतरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 09:25 IST2025-01-02T09:24:43+5:302025-01-02T09:25:18+5:30
पोलिसांच्या १७ युनिटच्या पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकांनी ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण शहरातील ८० ठिकाणी तपासणी नाके उभारून तळीरामांविरुद्ध श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी मोहीम राबविल्याची माहिती पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

दंडाची पावती मिळताच ३११ तळीरामांची उतरली
ठाणे : ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात थर्टी फर्स्टच्या रात्री व तत्पूर्वी दोन दिवसांत दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला.
वाहतूक पोलिसांनी केलेल्या तपासणी मोहिमेत गेल्या दोन दिवसांत ३११ तळीराम वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲन्ड ड्राइव्ह’ मोहिमेंतर्गत कारवाई केल्याची माहिती ठाण्याचे सह पाेलिस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी बुधवारी दिली. कारवाईत २७९ दुचाकीस्वार, १२ ट्रक, ११ कार आणि नऊ रिक्षाचालकांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांच्या १७ युनिटच्या पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकांनी ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण शहरातील ८० ठिकाणी तपासणी नाके उभारून तळीरामांविरुद्ध श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी मोहीम राबविल्याची माहिती पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. या तपासणी मोहिमेत वाहतूक शाखेचे २२ अधिकारी आणि ११० पोलिस कर्मचाऱ्यांसह वॉर्डन पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कल्याण-डोंबिवलीत ७३ मद्यपींवर कारवाई झाली. त्यामध्ये आठ जण हे वाहनचालकाशेजारी दारू पिऊन बसलेले होते. नारपोली येथे सर्वाधिक २७ चालकांवर कारवाई करण्यात आली.
रायगडमध्ये ७ लाख ९१ हजारांची दारू जप्त
अलिबाग : नववर्ष स्वागत करताना अवैध पद्धतीने दारू विक्री करणाऱ्या, बाळगणाऱ्यांविरोधात जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. १२ प्रकरणांत १३ जणांना अटक केली असून दोन वाहने जप्त केली. यात ७ लाख ९१ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हा उत्पादन शुल्क विभागाची सात पथके जिल्ह्यात तैनात ठेवण्यात आली होती. ३१ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पथकाची गस्त ठेवण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी रविकिरण कोले यांनी दिली आहे.
१०५ जणांवर पालघरमध्ये कारवाई
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघर जिल्ह्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट, ढाबे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होणार असल्याने ठिकठिकाणी पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये डंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या १०५ मद्यपींविरोधात गुन्हे दाखल केले. तर अन्य रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १९२ जणांवर कारवाई करून सव्वा लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
नवी मुंबईत ४३४ मद्यपी चालकांवर कारवाई...
थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी राबवणाऱ्या विशेष मोहिमेंतर्गत रात्रभर कारवाया करण्यात आल्या. यात ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या ४३४ चालकांची झिंग उतरवण्यात आली. त्याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन, ५ ऑर्केस्ट्रा व ७ सर्व्हिस बार, ६ हुका पार्लर या आस्थापनांवर कारवाया केल्या आहेत, तसेच उघडघ्यावर मद्यपान, नशा करणाऱ्यांवर कारवाया करण्यात आल्या आहेत.