Thane: ठाण्यात पुन्हा ३० मीटर बॉक्स जळून खाक; ७५ वर्षीय आजींसह अडकलेले रहिवासी सुखरूप
By अजित मांडके | Updated: November 16, 2023 16:30 IST2023-11-16T16:30:11+5:302023-11-16T16:30:31+5:30
Thane News: एकाच दिवशी दिवा आणि उपवन येथे मीटर रूम मधील मीटर बॉक्स जळून खाक झाल्याची घटना ताजी असताना, गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड वाघबीळ येथील गार्डन कोर्ट सोसायटीच्या "ए" विंग या इमारतीच्या तळ मजल्यावरती असणाऱ्या मीटर बॉक्स रुममध्ये लागलेल्या आगीत तब्बल ३० मीटर बॉक्स जळून खाक झाली आहेत.

Thane: ठाण्यात पुन्हा ३० मीटर बॉक्स जळून खाक; ७५ वर्षीय आजींसह अडकलेले रहिवासी सुखरूप
- अजित मांडके
ठाणे - एकाच दिवशी दिवा आणि उपवन येथे मीटर रूम मधील मीटर बॉक्स जळून खाक झाल्याची घटना ताजी असताना, गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड वाघबीळ येथील गार्डन कोर्ट सोसायटीच्या "ए" विंग या इमारतीच्या तळ मजल्यावरती असणाऱ्या मीटर बॉक्स रुममध्ये लागलेल्या आगीत तब्बल ३० मीटर बॉक्स जळून खाक झाली आहेत. यावेळी झालेल्या मोठ्या धूरामुळे सहाव्या मजल्यावर अडकलेल्या ७५ वर्षीय यमुनाबाई टोकरे या आजीबाईंसह काही नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील तळ अधिक सात मजली इमारतीत आग लागली असून धूर मोठया प्रमाणात झाला आहे अशी माहिती जिज्ञा वाडेकर यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेत फोन करून दिली. तातडीने घटनास्थळी महावितरण , आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. घटनास्थळीमीटर बॉक्स रूममध्ये आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने त्या इमारतीमध्ये काही रहिवाशी अडकले होते. त्या रहिवाशांची अग्निशमन दलाचे जवानी यांच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच यमुनाबाई टोकरे या आजीबाई इमारतीच्या सहाव्या मजल्यावरती धुरामध्ये अडकल्या होत्या. त्यांनाही अग्निशमन दलाचे जवानांच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तसेच त्या आगीवर काही मिनिटात नियंत्रण मिळविण्यात यश आले असून या आगीमध्ये मीटर बॉक्स रूम मधील एकूण-३० मीटर बॉक्स व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.