आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 06:56 IST2025-07-30T06:56:10+5:302025-07-30T06:56:39+5:30
महापालिका निवडणुका जवळ आल्याने ठाण्यात आता शिंदेसेना व उद्धवसेनेत शाब्दिक चकमक रंगू लागली आहे.

आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महापालिका निवडणुका जवळ आल्याने ठाण्यात आता शिंदेसेना व उद्धवसेनेत शाब्दिक चकमक रंगू लागली आहे. उद्धवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार देण्याऐवजी ‘वाचाळ रत्न पुरस्कार’ द्यायला हवा, अशी टीका केली. त्यावर म्हस्के यांनी विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचे सांगितले.
कोपरी पुलाचे काम सुरू असल्याने विचारे यांनी त्याची सोमवारी पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, म्हस्के यांना खासदार म्हणून करायच्या कामाची माहिती देण्याची गरज आहे. कोपरी पुलाच्या दुरुस्तीला २०१८ साली परवानगी मिळाली. त्यासाठी आपण पाठपुरावा केला होता. मात्र, तीन वर्षे हे काम रेंगाळत राहिले. आता कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचा खासदाराने पाठपुरावा करणे आवश्यक आहे; पण सध्या असे होत नाही. आताचे खासदार केवळ बडबड करतात, अशी टीका विचारे यांनी केली.
संसद रत्न म्हणजे काय? हे कळणार नाही
म्हस्के यांनी विचारे यांच्या टीकेला सोशल मीडियावरून उत्तर दिले. ‘होय, राजन आजोबा, मी अजून बच्चा आहे आणि मोठा होत आहे. तुम्ही लोकसभा पटलावर गेल्यापासून थकलेलेच आहात. तुम्ही पोळीवर नाटक केले, ते सर्वांच्या लक्षात आहे. ना तुम्ही कधी प्रश्न विचारले, ना ठाणेकरांच्या समस्या संसदेत मांडल्या. त्यामुळे संसद रत्न काय भानगड आहे, हे तुम्हाला कळणार नाही,’ असे म्हस्के यांनी म्हटले आहे.
‘तुम्ही लोकसभा निवडणूक हरलात, विधानसभेतही तुम्हाला गाशा गुंडाळावा लागला. आता महापालिकेतही तुम्हाला उभे राहावे लागेल. चांगले आहे, माणसाने प्रयत्नवादी असले पाहिजे,’ अशी खिल्लीही त्यांनी उडवली. महापालिका निवडणुकीत हातावर फक्त भोपळा लागला, तर तुमची मानसिक अवस्था वाईट होइल, आजोबा,’ असेही त्यांनी खोचकपणे म्हटले आहे.