ठाकरे सरकारकडून बलात्काऱ्यांना राजाश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST2021-07-15T04:27:46+5:302021-07-15T04:27:46+5:30
ठाणे : बलात्काऱ्यांना राजाश्रय देण्याचे काम सरकार करीत आहे, असा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बुधवारी ठाण्यात ...

ठाकरे सरकारकडून बलात्काऱ्यांना राजाश्रय
ठाणे : बलात्काऱ्यांना राजाश्रय देण्याचे काम सरकार करीत आहे, असा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बुधवारी ठाण्यात केला.
महिलांच्या सुरक्षेसाठी ‘शक्ती’ कायदा आणला जात आहे; मात्र, त्याचा वापर महिलांना संरक्षण देण्याच्या ऐवजी गुन्हेगारांनाच पाठीशी घालण्यासाठी होत असल्याचे त्या म्हणाल्या. ठाणे महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत आरोग्य विभागाच्या उपायुक्तांनी अश्लील वर्तन केले असल्याचे प्रकरण उजेडात आणून महाराष्ट्रात अशा प्रकारे सगळीकडे महिलांवर अत्याचार होत असल्याचे त्यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत सांगितले.
या वेळी आमदार निरंजन डावखरे, भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, ठाणे महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे उपस्थित होत्या.
पालिका आणि पोलीस आयुक्तांची घेतली भेट
यासंदर्भात पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा तसेच पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांचीदेखील चित्रा वाघ यांनी भेट घेतली. पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, ठाणे पालिका आयुक्तांनी विशाखा समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्राचा सायबर सेल झोपला आहे का?
प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी या अनेक विषयांवर आपली मते व्यक्त करीत असतात. मात्र, बाईच्या दिसण्यावरच बोलले जाते, तिच्या असण्यावर कधीच बोलले जात नाही. ती किती चांगली अभिनेत्री आहे हे बोलायचे सोडून काही तरी विकृत बोलले जाते. आता सोशल मीडियावर हेच करणार का? महाराष्ट्राचा सायबर सेल झोपला आहे का, असा प्रश्न त्यांनी केला.