कोरोनाकाळात तृतीयपंथी दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 01:27 AM2020-07-31T01:27:06+5:302020-07-31T01:27:12+5:30

मंत्रालयात आंदोलनाचा इशारा : कोणतीही मदत न मिळाल्याने उपासमार

Tertiary neglected in the Corona period | कोरोनाकाळात तृतीयपंथी दुर्लक्षित

कोरोनाकाळात तृतीयपंथी दुर्लक्षित

Next

प्रज्ञा म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाकाळात सर्वसामान्यांचे हाल झाले असताना दुसरीकडे तृतीयपंथी समाजही दुर्लक्षित राहिला आहे. तृतीयपंथींकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना अन्नधान्यही मिळू शकले नाही. लॉकडाऊनमुळे मंगती आणि बधाई बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एवढे हाल होत असताना, राज्याचे मुख्यमंत्री आहेत तरी कुठे, असा प्रश्न तृतीयपंथी समाजाच्या कार्यकर्त्या माधुरी सरोदे शर्मा यांनी केला. असेच दुर्लक्षित राहिल्यास मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशारा या समाजाने दिला.
लॉकडाऊन जाहीर करताना केवळ सामान्य लोकांचा विचार केला. आज दुकाने, ट्रेन बंद असल्याने तृतीयपंथींची मंगती बंद झाली, लग्नसोहळ्यात ५0 माणसांच्या उपस्थितीला परवानगी असल्याने त्यांची बधाई बंद झाली. मग या समाजाने जायचे तरी कुठे? केंद्र सरकारला आमच्या समस्यांचे पत्र लिहिले तेव्हा मे महिन्यात सीएसआर फंडातून प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे मंजूर झाले. भारतातील एकूण तृतीयपंथी समाजाच्या लोकसंख्येपैकी केवळ सात ते आठ हजार तृतीयपंथीना ही मदत पोहोचली. बँक खाते नसणे, आॅनलाइन व्यवहार न जमणे किंवा ही योजना त्यांच्यापर्यंत न पोहोचणे अशा विविध कारणांमुळे कितीतरी तृतीयपंथींपर्यंत मदत पोहोचलेली नाही, अशी नाराजी माधुरी यांनी व्यक्त केली.
रेशनकार्ड नसल्याने आम्हाला रेशन मिळू शकत नाही. आमच्या समाजातील लोक हे सर्वसामान्यांच्या वस्त्यांपासून कितीतरी दूर राहतात त्यांना मदत पोहोचविणार कोण? आधीच आमच्या समाजाबद्दल किळस आणि भीती असल्याने कितीतरी तृतीयपंथी उपाशी राहून दिवस काढत आहेत, असे या समाजाच्या श्रीदेवी यांनी सांगितले.
तृतीयपंथी हे भाडेतत्त्वावर राहत आहे, त्यांच्याकडे पैसे नसल्याने भाडे, वीजबिल भरू शकत नाहीत. लोकप्रतिनिधीही फिरकले नाहीत. सुदैवाने आमच्या समाजात कोरोना पसरला नाही. उद्या पसरला तर आमच्यासाठी सरकारच्या कोणत्याही उपयोजना नाहीत.
आधीच समाजातून हीन वागणूक मिळते. त्यात कोरोनाग्रस्त झाल्यावर तृतीयपंथींना कशी वागणूक मिळेल? परराज्यातून स्थलांतरित झालेल्या लोकांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची व्यवस्था सरकारने केली. आमचा समाजदेखील स्थलांतरित आहे.
आम्हाला कुटुंबाने हाकलून दिले आहे. आज उपासमारीची वेळ आल्याने आम्ही जायचे कुठे असा संतप्त सवाल तृतीयपंथींनी व्यक्त केला.
आधीच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट दिली नाही. आताचे मुख्यमंत्रीही आमच्या समस्या जाणून घेत नाहीत. पंतप्रधान आवास योजनेतून आम्हाला घरे हवी आहेत. आम्हाला रोजगारही हवा आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारने कल्याणकारी तृतीयपंथी मंडळाची स्थापना केली आहे. ते मंडळ अजून कार्यरत नाही, अशी खंत माधुरी यांनी व्यक्त केली.

Web Title: Tertiary neglected in the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.