नवरात्रीच्या कमानी तोडल्याने तणाव

By Admin | Updated: October 13, 2016 03:56 IST2016-10-13T03:56:23+5:302016-10-13T03:56:23+5:30

मोहरमनिमित्त काढलेल्या ताजियाच्या मिरवणुकीवेळी अडसर ठरत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या कमानी तोडण्यात आल्याने भिवंडीच्या गायत्रीनगरमध्ये

Tension in Navaratri breaking the arches | नवरात्रीच्या कमानी तोडल्याने तणाव

नवरात्रीच्या कमानी तोडल्याने तणाव

भिवंडी : मोहरमनिमित्त काढलेल्या ताजियाच्या मिरवणुकीवेळी अडसर ठरत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या कमानी तोडण्यात आल्याने भिवंडीच्या गायत्रीनगरमध्ये संध्याकाळी तणाव निर्माण झाला. त्यातून दोन्ही गटांत दगडफेक झाल्याने जमावाची पळापळ सुरू झाली. त्यात काही जण जखमी झाले. जमावाने एक मोटारसायकलही जाळली. वातावरण तणावपूर्ण बनल्याने परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.
संवेदनशील शहर असल्याने सर्व सणांच्या काळात तेथे कडक पोलीस बंदोबस्त असतो. आतापर्यंतचे सर्व सण शांततेत पार पडले. नवरात्रीनिमित्त आगमन झालेल्या देवीच्या मूर्तींचे मंगळवारी विसर्जन झाले. पण, ठिकठिकाणी रस्त्यांत स्थानिक मंडळे, नगरसेवक, राजकीय पक्षांतर्फे स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. त्या अद्याप काढलेल्या नव्हत्या. आजादनगर, न्यू आजादनगर, नुरीनगर येथे बुधवारी मोहरमनिमित्त ताजियाची मिरवणूक काढण्यात आली. संध्याकाळी निघालेली ही मिरवणूक गायत्रीनगर, नागावमार्गे जात असताना रस्त्यातील स्वागत कमानींना अडली. ताजियाला कमानी अडसर ठरत असल्याने संतप्त जमावाने त्या तोडल्या. कमानींच्या बॅनरवर दुर्गादेवीचे फोटो असल्याने देवीचा अपमान झाल्याच्या भावनेने या घटनेचा विरोध करीत स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले. त्यातून दोन गटांत तणाव, वाद आणि नंतर दगडफेक झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पळापळ सुरू झाली. त्यामध्ये नागरिक विशेषत: लहान मुले रस्त्यावर पडली. त्यांना मार लागला. ताजिया मिरवणुकीवेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. सध्या गायत्रीनगरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रमसिंग पाटणकर, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिकांची मंदिरात सभा घेऊन समजूत काढली.

Web Title: Tension in Navaratri breaking the arches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.