बुलेट ट्रेनसाठी निविदा प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 06:29 IST2020-09-24T06:29:29+5:302020-09-24T06:29:40+5:30
टाटा, एल अॅण्ड टीसह सात कंपन्या इच्छुक : पहिल्या टप्प्यात २३७ किमी मार्गाची उभारणी

बुलेट ट्रेनसाठी निविदा प्रक्रिया सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबई-अहमदाबाद या भारतातील पहिल्यावहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) यांनी नवी दिल्लीत बुधवारी तांत्रिक निविदा खुल्या केल्या. या स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेत तीन निविदाकर्त्यांनी सहभाग घेतला, ज्यात सात मोठ्या बांधकाम कंपन्यांचा समावेश आहे.
यात अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, जेएमसी प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड यांनी संयुक्तपणे, एल अॅण्ड टी लिमिटेड यांनी स्वतंत्रपणे, तर एनसीसी लिमिटेड-टाटा प्रोजेक्ट लिमिटेड-जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड यांनी संयुक्तपणे सहभाग घेतला आहे.
मुंबई-अहमदाबाद या ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन मार्गादरम्यान १२ स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. एकूण मार्गापैकी २३७ किमी लांबीचा मार्ग आणि चार स्थानके यांच्या उभारणीसाठी एनएचएसआरसीएलने बुधवारी निविदा खुल्या केल्या. आतापर्यंतची ही सर्वात मोठी निविदा आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान ९० हजार रोजगारांची निर्मिती होणार असून उत्पादन क्षेत्रालाही मोठे बळ मिळणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत ७५ लाख मेट्रिक टन सिमेंटचा वापर होणार आहे. बांधकामासाठी मोठ्या यंत्रांचीही गरज भासणार असल्याचे बुलेट ट्रेनच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.
या चार स्थानकांचा आहे समावेश
च्वापी ते बडोदा या दरम्यानच्या २३७ किमी लांबीच्या मार्गात वापी, बिलिमोरा, सुरत आणि भरूच या चार स्थानकांच्या बांधकामासह नदीवरील २४ पूल, तर रस्त्यांवरील ३० पुलांचा समावेश आहे.
च्बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमध्ये आतापर्यंत ८३ टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याने तेथील कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कामे सुरू करण्यास भूसंपादनाचा अडथळा निर्माण झाला आहे.