ज्ञान, संस्कार देणारा शिक्षकच समाजाचा कणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 01:01 AM2019-09-15T01:01:46+5:302019-09-15T01:01:53+5:30

विद्यार्थी घडवण्यात शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा आहे. ज्ञानासोबतच संस्कार देण्याचे काम शिक्षक करतात.

The teacher who gives knowledge, rites, is the backbone of the society | ज्ञान, संस्कार देणारा शिक्षकच समाजाचा कणा

ज्ञान, संस्कार देणारा शिक्षकच समाजाचा कणा

googlenewsNext

भिवंडी : विद्यार्थी घडवण्यात शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा आहे. ज्ञानासोबतच संस्कार देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळेच चांगल्या समाजाची निर्मिती होत असल्यामुळे शिक्षकच समाजाचा कणा असल्याचे उद्गार भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रमात काढले.
भिवंडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे अंजुरफाटा येथील हालारी वीसा ओसवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या शांती चंदन आॅडिटोरियम येथे शनिवारी शिक्षक गौरव समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी राज्याच्या हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दीपाली पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सपना भोईर, जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन आणि दुग्ध समितीचे सभापती किशोर जाधव, पंचायत समिती भिवंडीच्या सभापती रवीना जाधव, उपसभापती वृषाली विशे आदी उपस्थित होते.
पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढला आहे. त्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या घसरत आहे. तर, दुसरीकडे जागतिक स्पर्धेत मराठी माध्यमांच्या मुलांचा आत्मविश्वास कमी पडत आहे. त्यामुळे मराठी शाळांमधील मुलांचा आत्मविश्वास जागवण्याचे व मराठी शाळांचा पट वाढवण्याचे महत्त्वाचे काम शिक्षकांनी करणे गरजेचे असल्याचा सल्ला खा. पाटील यांनी शिक्षकांना दिला. कर्तृत्व गाजवण्यासाठी मराठी शाळांमधली मुले नेहमीच प्रयत्नशील असतात. आज व्यासपीठावर विविध पदांपर्यंत पोहोचलेले सर्वच मान्यवर मराठी शाळेचे विद्यार्थी होते. त्यासाठी मराठी शाळांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी त्यांच्यातील क्षमता ओळखल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी आनंददायी शाळा सुरू करणे काळाची गरज आहे. या आनंददायी शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेताना अभ्यासाचा कंटाळा करणार नाहीत. असे आनंददायी वातावरण जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळांमध्ये निर्माण करायला पाहिजे. त्यासाठी शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता जिल्हा परिषदेने स्वत: पुढाकार घेणे गरजेचे असल्याचा सल्लाही उपस्थित अधिकारी व लोकप्रतिनिधींना खा. पाटील यांनी दिला. शिक्षकांनी शिक्षकी पेशा हे व्रत म्हणून स्वीकारले तर देशविकासाला चालना देणारा विद्यार्थी घडेल, अशी अशा आपल्या भाषणातून त्यांनी व्यक्त केली.
>या शिक्षकांचा गौरव
या शिक्षक गौरव कार्यक्र माप्रसंगी भिवंडी तालुक्यातील एकूण ९९३ शिक्षकांमधून १० शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला. आनगाव पिलांझे शाळेच्या जयश्री ठाकरे, राहनाळ शाळेचे सुरेश साळुंखे, गणेशपुरी पिरपाडा शाळेच्या शमा शेख, मानकोली शाळेच्या ज्योती ठाकरे, पडघा शेरेकरपाडा शाळेचे मधुकर महानुभाव, लाखिवली शाळेचे सुभाष वरठा , कांबे मीठपाडा शाळेचे विलास पाटील, दाभाड कांदळी शाळेचे संजय पाटील, पडघा भोईरपाडा शाळेच्या कांचन भोईर , भिनार पवारवाडी शाळेच्या पद्मा श्रीपती तसेच चिंबीपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप परदेशी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

Web Title: The teacher who gives knowledge, rites, is the backbone of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.