सर्व जिल्हा बँकेमध्ये श्रीमंत बँक असलेली टीडीसीसीच्या निवडणूक रिंगणात ४६ उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 23:23 IST2021-03-22T23:22:50+5:302021-03-22T23:23:12+5:30
विद्यमान उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे हे त्यांच्या सात प्रतिस्पर्धी उमेदवारांना तोंड देत आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी ४६ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्यामुळे ४६ प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला.

सर्व जिल्हा बँकेमध्ये श्रीमंत बँक असलेली टीडीसीसीच्या निवडणूक रिंगणात ४६ उमेदवार
सुरेश लोखंडे
ठाणे : दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेची पंचवार्षिक निवडणूक ३० मार्चला आहे. बँकेचे सहा संचालक बिनविरोध विजयी झाले आहेत. आता शिल्लक राहिलेल्या १५ संचालकांच्या निवडणुकीसाठी ४६ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. सोमवारी शेवटच्या दिवसांपर्यंत ४६ जणांनी उमेदवारी मागे घेतली आहे. सहकार पॅनल व महाविकास परिवर्तन पॅनलच्या नेतृत्वाखाली या बँकेचा निवडणूक प्रचार आता रंगणार आहे.
विद्यमान उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे हे त्यांच्या सात प्रतिस्पर्धी उमेदवारांना तोंड देत आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी ४६ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्यामुळे ४६ प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला. राज्यभरातील सहकारमधील दिग्गजांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीत राज्यात सत्तेवरील महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी एकत्र येऊन त्यांचे पुरस्कृत उमेदवार दिले आहेत. बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या उर्वरित सहकाऱ्यांचे सहकार पॅनल तयार केल्याचे त्यांनी सांगितले. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे महाविकास परिवर्तन पॅनल असल्याचे विद्यामान संचालक सुभाष पवार व बाबाजी पाटील यांनी लोकमतला सांगितले.
राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या या टीडीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी १०५ जणांनी त्यांचे २०६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी सहा जणांविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ते सहा संचालक बिनविरोध विजयी झाले. तर या उमेदवारांच्या छाननीत आठ जणांचे अर्ज बाद झाले.