अवघ्या चार दिवसात २४ कोटींचा कर जमा

By Admin | Updated: November 16, 2016 04:17 IST2016-11-16T04:17:06+5:302016-11-16T04:17:06+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेने १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान जुन्या नोटांद्वारे वसूल केलेल्या कराची रक्कम २४ कोटींवर गेली आहे. यामुळे

Tax collection of 24 crores in just four days | अवघ्या चार दिवसात २४ कोटींचा कर जमा

अवघ्या चार दिवसात २४ कोटींचा कर जमा

भाईंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान जुन्या नोटांद्वारे वसूल केलेल्या कराची रक्कम २४ कोटींवर गेली आहे. यामुळे कधी नव्हे एवढी वसुली अवघ्या चार दिवसात प्रथमच झाली. या रकमेचा शहरातील विकासकामांना हातभार लागण्याची शक्यता आहे.
शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने त्याच्या दुरुस्तीला आवश्यक निधीची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे प्रशासनाने हे खड्डे दुरुस्तीअभावी कित्येक दिवस जैसे थे ठेवले होते. अखेर त्याविरोधारात विविध राजकीय पक्षांनी तक्रारींसह आंदोलन करण्यास सुरुवात केल्यानंतर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्वरित खड्डे दुरुस्तीला आवश्यक असलेल्या निधीसाठी आढावा बैठक बोलवली होती. त्यात इतर लेखाशिर्षातून वर्ग केलेला निधी पुरेसा नसल्याचे समोर आल्याने केवळ ठराविक भागातील रस्त्यांसह त्यावर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आली. त्यावेळी मात्र प्रशासनाने डांबरीकरणासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा पुरवठा कमी झाल्याची सारवासारव केली होती.
केंद्र सरकारने चलनातून बाद केलेल्या हजार, पाचशेच्या नोटा पालिकेला स्वीकारण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले. त्यानंतर थकीत कराच्या वसुलीला पालिकेने जोमाने सुरुवात केली. तत्पूर्वी पालिकेने या नोटा स्वीकारण्यास मनाई केली होती. नोटा स्वीकारण्याच्या निर्देशानुसार पालिकेने कराच्या माध्यमातून त्या नोटा १० नोव्हेंबरपासून स्वीकारण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी सुमारे ७२ लाखाचा कर तिजोरीत जमा झाला. कर वसुलीची मुदत १४ नोव्हेंबरपर्यंत वाढविल्याने शेवटच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत हा आकडा २४ कोटींवर गेला. (प्रतिनिधी)

Web Title: Tax collection of 24 crores in just four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.