तळोजा-डोंबिवली-कल्याण मेट्रोचा डीपीआर ९ महिन्यांत; प्रकल्पाला गती देण्याच्या खा. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 17:02 IST2017-09-23T17:01:47+5:302017-09-23T17:02:08+5:30
डोंबिवलीला मेट्रोच्या मॅपवर आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश येत असून येत्या अवघ्या ९ महिन्यांमध्ये तळोजा-डोंबिवली-कल्याण या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर होणार आहे.

तळोजा-डोंबिवली-कल्याण मेट्रोचा डीपीआर ९ महिन्यांत; प्रकल्पाला गती देण्याच्या खा. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
ठाणे - डोंबिवलीला मेट्रोच्या मॅपवर आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश येत असून येत्या अवघ्या ९ महिन्यांमध्ये तळोजा-डोंबिवली-कल्याण या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर होणार आहे. एमएमआरडीएने यासाठी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनची नियुक्ती केली असून येत्या ९ महिन्यांत प्रकल्प अहवाल प्राप्त होणार असल्याचे एमएमआरडीएने खासदार डॉ. शिंदे यांना पत्राद्वारे कळवले आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्यावर्षी २० ऑक्टोबर रोजी वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन तळोजा-डोंबिवली-कल्याण मेट्रोचे सादरीकरण केले होते. डोंबिवलीकरांना ठाणे आणि मुंबईला येण्यासाठी रेल्वे वगळता अन्य पर्याय नाही. त्यामुळे रेल्वे सेवा कोलमडल्यानंतर त्यांचे अतोनात हाल होतात. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून खासदार डॉ. शिंदे यांनी कल्याणपर्यंत येणारी मेट्रो नवी मुंबई मेट्रोला तळोजा येथे डोंबिवली आणि शीळ मार्गे जोडावी, अशी मागणी केली होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याच बैठकीत या मार्गाला तत्वतः मंजुरी दिली होती. त्यानंतर खा. डॉ. शिंदे सातत्याने एमएमआरडीए आणि मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर पाठपुरावा करत आहेत. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात बैठक झाली असता त्यांनी सदर मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पहिल्या टप्प्यात घेण्याची ग्वाही दिली होती. त्यावर त्वरित या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. त्यानुसार दिल्ली मेट्रोची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली असून येत्या ९ महिन्यांतच सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला जाणार असल्याचे एमएमआरडीएने कळवले आहे.
त्यामुळे या प्रकल्पाचा एक महत्वाचा टप्पा गाठला गेला असून डोंबिवलीकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. केवळ डोंबिवलीच नव्हे, तर कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ, दिवा, २७ गावे, मुंब्रा, कौसा, व १४ गवे अशा विस्तीर्ण प्रदेशातील सुमारे २० ते २५ लाख नागरिकांना या मेट्रोचा लाभ होणार असल्याचे खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.