"अवैध रेती उपसा करणारे डेझर व सक्शन पंपवर कारवाई करा",खा.बाळ्या मामा यांची मागणी
By नितीन पंडित | Updated: December 24, 2024 15:48 IST2024-12-24T15:46:46+5:302024-12-24T15:48:39+5:30
Bhiwandi News: रेती माफियांकडून डेजर व सक्षम पंपाच्या साह्याने राजरोसपणे अवैध रेती उपसा होत असल्याने अवैध रेती उपसा करणाऱ्या डेजर व सक्षम पंपवर महसूल विभागाने कारवाई करावी अन्यथा स्थानिक भूमिपुत्र या डेजर व सक्षम पंप वर कारवाई करतील असा इशारा भिवंडी लोकसभेचे खा. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी महसूल यंत्रणेला दिला आहे.

"अवैध रेती उपसा करणारे डेझर व सक्शन पंपवर कारवाई करा",खा.बाळ्या मामा यांची मागणी
- नितीन पंडित
भिवंडी - भिवंडीतील खाडीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा होत असून रेती माफियांकडून डेजर व सक्षम पंपाच्या साह्याने राजरोसपणे अवैध रेती उपसा होत असल्याने अवैध रेती उपसा करणाऱ्या डेजर व सक्षम पंपवर महसूल विभागाने कारवाई करावी अन्यथा स्थानिक भूमिपुत्र या डेजर व सक्षम पंप वर कारवाई करतील असा इशारा भिवंडी लोकसभेचे खा. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी महसूल यंत्रणेला दिला आहे. मंगळवारी खा. म्हात्रे यांनी तहसीलदार अभिजीत खोले यांची भेट घेऊन या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी तालुक्यातील तांडेल मंडल व डुबी मारून रेती काढणारे व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिवंडीतील खाडीपात्राच्या किनारी असलेल्या गावांमध्ये डुबी मारून रेती काढण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू होता.मात्र शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळ ( मेरीटाइन बोर्ड)कडून नियमांची पायमल्ली करून डुबी मारून रेती उत्खनन करणे बंद करून डेजर व सक्षम पंपच्या माध्यमातून रेती उत्खनन करण्यास परवानगी दिल्याने तालुक्यातील हजारो स्थानिक भूमिपुत्र व डुबी मारून रेती काढणाऱ्या व्यावसायिकांचे पारंपरिक व्यवसाय बंद झाला असून अनेक भूमीपुत्रांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे मत यावेळी खा.म्हात्रे यांनी व्यक्त करत सोमवारी तांडेल मंडळाने थेट नागले खाडीपात्रात या विरोधात केलेल्या आंदोलनात आपण स्वतः सहभागी झालो होतो,या स्थानिक नागरिकांना न्याय देण्यासाठी आपण सर्व कायदेशीर लढाया लढणार असून मागील अनेक वर्षांपासून खाडीपात्रात डेझरच्या माध्यमातून अवैधपणे रेती उपसा सुरू आहे, मात्र महसूल विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील यावेळी खा.बाळ्या मामा यांनी करत महसूल यंत्रणेला धारेवर धरले होते.
यासंदर्भात शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीतून मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन भिवंडी तहसीलदार अभिजीत खोले यांनी खा. बाळ्या मामा यांना दिले. तर महसूल यंत्रणेने स्थानिक भूमिपुत्रांचा व रेती व्यावसायिकांचा अंत पाहू नये, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत योग्य मार्ग निघाला नाही तर आम्ही स्वतः डेजर व सक्षन पंपवर कारवाई करू असा इशारा यावेळी खा. बाळ्या मामा यांनी दिला आहे.