Sword sheath of angry after the overwhelming majority of Congress | काँग्रेस श्रेष्ठींच्या तंबीनंतर नाराजांची तलवार म्यान
काँग्रेस श्रेष्ठींच्या तंबीनंतर नाराजांची तलवार म्यान

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार करण्याबाबतचे आदेश पक्षाने देऊनही काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्या गटाने असहकार केल्याची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेऊन कानउघाडणी केल्यानंतर आता शिंदे यांचा गट सुतासारखा सरळ आला आहे.

आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच प्रचार करू, असा इशारा शिंदे यांनी दिला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींनी कान टोचल्यावर काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह नाराज मंडळींनी राष्टÑवादीपेक्षा काँग्रेसच परांजपे यांना जास्त मते मिळवून देईल, असा नारा देत यू टर्न घेतला.
ठाणे शहर काँग्रेसमधील ब्लॉक अध्यक्षांनी ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड असतील, त्या ठिकाणी आम्ही प्रचार करणार नसल्याची भूमिका घेणारे पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठवले होते. तत्पूर्वी काँग्रेसमधील पूर्णेकर गटाने राष्टÑवादीच्या उमेदवाराला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका जाहीर केल्याने काँग्रेसमधील दोन गटांमधील वाद उफाळून आल्याचे दिसले. राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पुढाकार घेत, काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांच्या उपस्थितीत अगोदर तोडगा काढला होता. त्यानंतरही ठाण्यातील काँग्रेसच्या काही मंडळींनी राष्टÑवादीविरोधात असहकार पुकारला होता. त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्या पूर्ण झाल्या तरच आम्ही निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करू, असेही स्पष्ट केले होते. मागण्या अमान्य झाल्यास मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या मंडळींनी घेतला होता. राष्टÑवादीच्या नेत्यांनी ही बाब काँग्रेसच्या नेतृत्वाच्या निदर्शनास आणली. काँग्रेसच्या श्रेष्ठींकडूनही नाराज मंडळींची कानउघाडणी झाल्यानंतर मंगळवारी झालेल्या आघाडीच्या मेळाव्याला या नाराजांना राष्टÑवादीने पहिल्या रांगेत जागा देऊ केली.

विशेष म्हणजे नाराज मनोज शिंदे यांच्या हस्ते राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्याच पक्षातील काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी नाराज मनोज शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांची भरसभेत कानउघाडणी केली. काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसून सर्व राजी असल्याचे त्यांनी सांगितले. परांजपे यांचे काम करायचे असल्याचा आदेश राहुल गांधी यांचा असून ज्यांना काम करायचे नसेल, त्यांनी खुशाल घरी बसावे, असा निर्वाणीचा सूर त्यांनी लावला.

काँग्रेसमधील गटबाजीची कबुली
काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षातील गटबाजी संपवण्यात आम्हाला यश आले नसल्याची कबुली यावेळी दलवाई यांनी दिली. मात्र, त्याचवेळी राष्टÑवादीने ही गटबाजी संपुष्टात आणली असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसमधील नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडल्याने ही बाब आघाडीसाठी नक्कीच जमेची बाजू असली, तरी हा नाराज गट प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात कसा व कितपत सक्रिय होतो, याकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे व काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे बारीक लक्ष आहे.

स्थानिक नाराज नेत्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर प्रामाणिकपणे काम करण्याच्या मोठमोठ्या गोष्टी करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र निवडणूक कामातून अंग काढायचे, असे विश्वासघातकी प्रकार होणार नाहीत, याकडे पक्षस्तरावर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


Web Title: Sword sheath of angry after the overwhelming majority of Congress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.