कोपरीमधील एसआरए प्रकल्पात भाडेकरूचा संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 08:53 IST2025-08-26T08:53:30+5:302025-08-26T08:53:49+5:30
Thane News: कोपरी येथे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) योजनेच्या प्रकल्पात भाड्याने राहणारे सुरेश बुजवाणी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जनता दरबारात तक्रार आल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी चौकशीचे आदेश पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोपरीमधील एसआरए प्रकल्पात भाडेकरूचा संशयास्पद मृत्यू
ठाणे - कोपरी येथे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) योजनेच्या प्रकल्पात भाड्याने राहणारे सुरेश बुजवाणी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जनता दरबारात तक्रार आल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी चौकशीचे आदेश पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोपरीतील एका बिल्डरमार्फत एसआरए प्रकल्पातील पार्किंगसाठी इमारत उभारण्यासाठी पाया खोदला जात होता. त्यात इमारतीलगतच्या चार खोल्यांची नुकसानीची भीती होती. त्यामुळे संबंधित बिल्डरने खोल्या तोडून रहिवाशांना पुन्हा नव्याने बांधून देण्याची लेखी हमी दिली होती. त्यातील इंदू शुक्ला यांना रूम तोडल्यामुळे भाडे दिले जात नव्हते. भाडे देण्याऐवजी संबंधित बिल्डरने त्यांचा पोटभाडोत्री बुजवाणी यांना बांधकाम सुरू असलेल्या पाचव्या मजल्यावर जागा दिली. मात्र, ती जागा राहण्यायोग्य नव्हती. याच ठिकाणी बुजवाणी यांचा अचानक ३१ जुलै रोजी मृत्यू झाला.
बांधकाम व्यावसायिकाला १० कोटींचा दंड
गणेश नाईक यांच्या जनता दरबारात पवार यांनी व्यथा मांडून बुजवाणी यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. त्यानंतर नाईक यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना चौकशीचे आदेश दिले.
राज्य सरकारची रॉयल्टी चुकविल्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिकाला १० कोटींचा दंड ठाेठावला आहे. दंड भरला जात नसल्यामुळे संबंधित दंडाचा बोजाही ‘एसआरए’वर पडू नये, अशी मागणीही केली आहे.
इमारतीला महापालिकेची ओसी आणि सीसीही नव्हती. तरीही ती राहण्यासाठी बिल्डरने दिली. कामही अपुरे असल्याने तेथे जिनाही नाही. पाच मजले चढून, धुळीच्या त्रासाने बुजवाणी यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्यामुळेच या प्रकरणाच्या चाैकशीची मागणी केली.
- अभिजित पवार, कोपरी, ठाणे
दुर्गंधी सुटल्याने घटना उघडकीस
इमारतीमधील दुर्गंधीमुळे शोध घेतला तेव्हा अग्निशमन दलाने दरवाजा ताेडून बुजवाणी यांचा मृतदेह घरातून बाहेर काढला. त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा आरोप रहिवासी अभिजित पवार यांनी केला. याबाबत कोपरी पोलिसांनी कोणतीही माहिती जाहीर केली नसल्याचेही पवार यांनी सांगितले.