शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा; शहापूरमध्ये तहसीलदार कार्यालयावर काढला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 23:44 IST2020-12-03T23:43:58+5:302020-12-03T23:44:10+5:30
शहापूर पंचायत समितीसमोर येताच मोर्चेकऱ्यांनी काही काळ रास्ता रोको केले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा; शहापूरमध्ये तहसीलदार कार्यालयावर काढला मोर्चा
शहापूर : दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ गुरुवारी अखिल भारतीय किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय व सीटू यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतीविरोधी काळे कायदे रद्द करा, भाजप सरकार चले जाव, केंद्र सरकारने केलेले शेतकरीविरोधी आणि कामगारविरोधी कायदे मागे घ्या, वीज विधेयक मागे घ्या, सर्व शेतकरी-शेतमजुरांची कर्जमुक्ती करा, सर्व शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्या, वनाधिकार कायद्याची कसून अंमलबजावणी करा आदी घोषणा देत शहापूर बसस्थानकापासून मोर्चा निघाला.
तेथून शहापूर पंचायत समितीसमोर येताच मोर्चेकऱ्यांनी काही काळ रास्ता रोको केले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहापूर पंचायत समितीपासून बाजारपेठमार्गे मोर्चा तहसीलदार कार्यालयावर येताच आंदोलकांनी ठिय्या मारून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. या मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, भरत वळंबा, कृष्णा भावर, सुनील करपट, नितीन काकरा, भास्कर म्हसे, सुनीता ओझरे, निकिता काकरा, कमल वळंबा, विजय विशे यांनी केले होते.