आयुक्त जयस्वाल यांना पाठिंबा : गुरुवारी ठाणेकरांचा निषेधासाठी मिनिटभर ब्लॅकआउट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:22 IST2018-03-01T02:22:57+5:302018-03-01T02:22:57+5:30
ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीला सर्वसामान्य ठाणेकरांचा विरोध असून त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी बहुतांशठाणेकरांनी गुरुवार, १ मार्च रोजी रात्री ९ वाजता आपापल्या सोसायटीत एक मिनिट ब्लॅकआउट करण्याचे ठरवले आहे.

आयुक्त जयस्वाल यांना पाठिंबा : गुरुवारी ठाणेकरांचा निषेधासाठी मिनिटभर ब्लॅकआउट!
ठाणे : ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीला सर्वसामान्य ठाणेकरांचा विरोध असून त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी बहुतांशठाणेकरांनी गुरुवार, १ मार्च रोजी रात्री ९ वाजता आपापल्या सोसायटीत एक मिनिट ब्लॅकआउट करण्याचे ठरवले आहे.
आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या माध्यमातून ठाण्यात सुरू असलेली विकासकामे मार्गी लागावी, या हेतूने सामान्य ठाणेकरांनी जयस्वाल यांच्या बदलीला विरोध दर्शवला आहे. तसेच त्यांना ठाण्यात मुदतवाढ मिळावी, यासाठी ठाणेकरांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ इतर काही पर्यायी उपक्रम घेता येतील, या उद्देशाने ठाणेकरांची एक बैठक रविवारी नीलकंठ हाइट्स येथे पार पडली. यावेळी ठाणेकरांनी आयुक्तांच्या कामाचे कौतुक करून त्यांच्या मुदतवाढीसाठी आपण काय करू शकतो, याच्या थोडक्यात कल्पना मांडल्या. सह्यांच्या मोहिमेला अधिकाधिक प्रतिसाद मिळावा आणि ती अधिक मजबूत व्हावी, यासाठी शक्य त्या सोसायटीने आपल्या आवारात सहीसाठीचा बॅनर लावला, तर जे या मोहिमेत वेळेअभावी सहभागी झालेले नाहीत, त्यांना सही करून सहभाग नोंदवता येईल. तसेच सोसायटीच्या आवारात आयुक्तांना समर्थन देणारे बॅनर लावले, तर पाठिंब्याची कल्पना येईल, असे अजित सिंग म्हणाले. सुनील हडकर यांनी आयुक्तांना पाठिंबा देण्यासाठी एक मूक मोर्चा काढावा, असे सुचवले. तसेच जयस्वाल यांची वेळ घेऊन महिला फोरमला त्यांच्या भेटीसाठी पाठवावे आणि ठाणेकरांचा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे, याची कल्पना द्यावी, असा पर्याय नेल्सन डिमेलो यांनी सुचवला. जयस्वाल यांना ठाणेकरांचा वाढता पाठिंबा लाभत आहे.
होळीच्या पार्श्वभूमीवर वाईटावर चांगल्याचा विजय होतो, या उद्देशाने आयुक्तांच्या बदलीला विरोध म्हणून गुरुवार, १ मार्च रोजी ठाणेकरांनी आपापल्या सोसायटीत रात्री ९ वाजता एक मिनिट ब्लॅकआउट करण्याचे ठरवले आहे. त्यानंतर, सोसायटीमध्ये कॅण्डल मार्च काढण्याचे आवाहन केले आहे.
राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या ठाणे सिटीझन फोरमसारख्या अन्य संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आयुक्तांच्या पाठिंब्यासाठी तयार केलेले सह्यांचे निवेदन देऊन त्यांना मुदतवाढ देण्यासाठी विनंती करता येईल, असेही बैठकीत सुचवले गेले.