31 हजार वयोवृद्ध-निराधारांना ‘आधार’; प्रत्येकी एक हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 12:10 AM2021-04-20T00:10:52+5:302021-04-20T00:11:06+5:30

बँक खात्यात जमा करून राज्य सरकार दूर करणार आर्थिक चणचण

‘Support’ to 31 thousand elderly-destitute; One thousand each | 31 हजार वयोवृद्ध-निराधारांना ‘आधार’; प्रत्येकी एक हजार

31 हजार वयोवृद्ध-निराधारांना ‘आधार’; प्रत्येकी एक हजार

Next


सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी आदी केंद्र व राज्य पुरस्कृत योजना गोरगरीब, निराधारांसाठी राबविण्यात येत आहेत. त्याद्वारे वयोवृद्ध, निराधार, घटस्फोटित, विधवा आणि दिव्यांग आदींना अर्थसहाय्य दिले जात आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील या ३१ हजार १५२ लाभार्थ्यांना एक हजार रुपयांचे अर्थसहाय्य ॲडव्हान्समध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा करून राज्य शासन त्यांची आर्थिक चणचण दूर करणार आहे.
राज्य व केंद्र शासन पुरस्कृत या पाच अर्थसहाय्य योजना जिल्ह्यातील वयोवृद्धांसाठी श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व अनाथ, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, दिव्यांग आदी अर्थसहाय्य योजनांचा दरमहा लाभ घेत आहे. जिल्ह्यात या विशेष साहाय्य योजनेंतर्गत अनुदान वाटपाच्या योजना सुरू आहेत. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या ६५ व ६५ वर्षांवरील वृद्धांना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन सुरू आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनाही राबविण्यात येत आहे. इंदिरा गांधी योजनेद्वारे लाभार्थ्यांना प्रतिमहा २०० व ५०० रुपये निवृत्ती मिळते. त्याचा लाभ जिल्ह्यातील चार हजार २९३ वृद्धांना मिळतो. यासाठी यंदा ७१ लाखांचे अनुदान मंजूर झालेले आहे.
जिल्ह्यातील घटस्फोटित लाभार्थी महिलांना याचा लाभ दिला जात आहे. या लाभार्थी महिलेचा पुनर्विवाह झाला का, या चौकशीसह सत्यता पडताळून लाभ दिला जात आहे. याप्रमाणेच परित्यक्ता असलेल्या महिला बहुधा शासकीय, संस्थेच्या अनाथालयात राहतात. त्यांना या अर्थसहाय्य योजनेचा लाभ दिला जात आहे. विधवा महिला लाभार्थी महिलेस मुलगा असल्यास आणि तो २५ वर्षांचा झाल्यास या अर्थसहाय्याचा लाभ बंद होतो. 
दिव्यांग लाभार्थ्यांस राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ दिला जातो. केंद्र शासनाच्या योजनेच्या लाभासाठी दिव्यांगास ८० टक्के अपंगत्व असणे आवश्यक आहे. पण राज्य शासनाच्या योजनेसाठी ४० टक्केपर्यंत अपंगत्व असण्याची अट आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी दिव्यांग राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ घेत आहेत. या लॉकडाऊनच्या कालावधीत त्यांची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात राज्य शासनाने एक हजार रुपयांचे अर्थसहाय्य जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा जिल्ह्यातील ३१ हजार १५२ जणांना लाभ मिळणार आहे.

या लॉकडाऊन संकटकाळी राज्य शासनाने आमची आठवण ठेवून आमच्या गरीब, निराधार महिलांच्या बँक खात्यात जी काही रक्कम जमा करणार आहे, त्यासाठी आम्ही शासनाचे आभार मानतो. शासनाची ही आर्थिक मदत आमच्यासाठी लाखमोलाची असणार आहे.
    - अंजनाबाई कडू, कसारा, संजय गांधी निराधार योजना
आमच्यासारख्या महिलांना सध्याच्या या कोविड काळात शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी असली तरी लाख मोलाचा आधार देणारी आहे. या संकटकाळी शासनाने केलेल्या मदतीसाठी माझा परिवार आभारी आहे.
    - दुर्गा सुरेश दुडे, कसारा, निराधार अर्थसाहाय्य योजना 
मला महिन्याला, तर कधी चार,चार महिन्यांतून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे असेही उशिरा मिळतात. मात्र, कोरोना काळातही ते मिळायला उशीर होणार आहे, मग आम्ही जगायचं कसं. या काळातही रक्कम आम्हाला आधीच मिळवून देण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला पाहिजे -
    - अनुबाई सोनावळे, भातसानगर,
आमच्यासारख्या गरीब लोकांकडे प्रवासासाठी पैसे व कोणती साधने नाही. आम्ही मोठ्या आशेने कधीतरी बॅंकेत जातो. खात्यात पैसे जमा असतील तर ते काढण्यासाठी तीन तास लाइन लावतो. तरीदेखील आम्हाला या योजनेचे पैसे वेळेवर दिले जात नाही. यासाठी बँकांवर कारवाई करावी. सध्याच्या या मदतीसाठी शासनाचे मनापासून धन्यवाद.
    - ताराबाई वाघ, खोंड्याची वाडी, मुरबाड श्रावणबाळ योजना
या योजनेची रक्कम ठरलेल्या वेळेत बँक खात्यात जमा झालीच पाहिजे. अन्यथा या म्हातारपणात चालणेही आवघड झाले असताना बँकेत फेऱ्या माराव्या लागत आहे. बँकेत रांग लावून पण जर पैसे जमा असतील तर मिळतात. नाही तर रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागते. त्यामुळे आम्ही आता वैतागून आठ महिन्यांपासून बँकेत पैसे काढायला गेलो नाहीत. तसेच आम्हाला शासन अनुदान देते की नाही याबद्दल काही माहिती नाही. त्यामुळे बँकेत आलेल्या अनुदानाचा निरोप बँकेने खात्रीने आम्हाला घरी द्यावा. त्यानंतर आम्ही बँकेत जाऊ. बँकेत रांग लावण्याची अट आमच्यासाठी नसावी.    - झिपरूबाई पोसू वाघ, ठाकूरशेत, मुरबाड

Web Title: ‘Support’ to 31 thousand elderly-destitute; One thousand each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.