बदलापूरातील 150 नेपाळी कुटुंबियांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 19:10 IST2020-04-25T19:03:56+5:302020-04-25T19:10:23+5:30
नेपाली महासंघाच्या आवाहनाला शिवसेनेचा प्रतिसाद

शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी या 20 कुटुबियांसोबतच बदलापूरात कामानिमित्त आलेल्या इतर 130 कुटुंबाना देखील दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी महिनाभर पुरेल येवढे धान्य वाटप केले आहे.
बदलापूर - लॉकडाऊनमुळे अडकुन पडलेल्या बदलापूरातील नेपाळी कुटुंबियांना घरी जाता येत नसल्याने त्यांना मदत करावी असे आवाहन नेपाळी महासंघाच्या वतीने करण्यात आले होते. त्याला बदलापूरातील शिवसेनेने चांगला प्रतिसाद दिला असुन बदलापूरातील सुमारे 150 नेपाळी कुटुंबाला आधार देण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. त्या कुटुंबाला दुपारच्या जेवणाची आणि महिनाभर पुरेल येवढे धान्य देण्यात आले आहे.
जिल्ह्यात कामानिमित्त आलेल्या शेकडो नेपाळी कुटुंब हे उपासमारीचे बळी पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकेल्या नेपाळी कुटुबियांनी नेपाळी महासंघाकडे मदतीची मागणी केली होती. मात्र नेपाळी महासंघ देखील लॉकडाऊनमुळे सर्व ठिकाणी मदत देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्या त्या शहरातील दानशुर व्यक्तींनी नेपाळी कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. बदलापूरात देखील 150 नेपाळी कुटुंब असुन त्यातील 20 कुटुंबियांनी नेपाळी महासंघाकडे मदतीची मागणी केली होती. या आवाहनाला साद देत शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी या 20 कुटुबियांसोबतच बदलापूरात कामानिमित्त आलेल्या इतर 130 कुटुंबाना देखील दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी महिनाभर पुरेल येवढे धान्य वाटप केले आहे. तसेच त्यांना लॉकडाऊन संपल्यावर त्यांच्या गावी जाण्याची इच्छा असल्यास त्यांच्या गावी जाण्यासाठी देखील मदतीचा हात दिला. बलापूरातील 150 कुटुंबियांना मदत करुन शिवसेनेने नेपाळी महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.