त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करून सात दिवसांत अहवाल सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:51 IST2021-04-30T04:51:02+5:302021-04-30T04:51:02+5:30
ठाणे : येथील वर्तक नगरच्या वेंदात हॉस्पिटलमधील त्या चार रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाले नसल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून आता ...

त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करून सात दिवसांत अहवाल सादर करा
ठाणे : येथील वर्तक नगरच्या वेंदात हॉस्पिटलमधील त्या चार रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाले नसल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून आता स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे ठाणे महापालिकेने रुग्णालयाला होत असलेला प्राणवायु पुरवठा, अतिदक्षता विभागातील रुग्ण आणि प्राणवायु पुरवण्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा यांची नियमित त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करावी, यासाठी तत्काळ त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करून त्याबाबतचा अहवाल आरोग्य विभागाला पुढील सात दिवसांत सादर करावा, असे आदेश दिले आहेत.
उच्चस्तरीय चौकशी समितीने दिलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे ठाणे महापालिका प्रशासनाने वेदांत रुग्णालयाला महत्त्वाच्या सूचना करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या आरोग्याची स्थिती त्यांच्या नातेवाइकांना नियमित देण्यासाठी प्रशिक्षित व्यक्तींची नियुक्ती करावी, अशा व्यक्तीच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद घडवून आणावा. ही कार्यवाही विनाविलंब तत्काळ करण्यात यावी. रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती व त्यांची आरोग्य स्थिती वेळोवेळी पसतेवाइकांना कळविण्याची यंत्रणा निर्माण करावी, जेणेकरून रुग्णालय व्यवस्थापन व रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये गैरसमज होणार नाहीत, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.