निसर्गमेळ्यातून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली काजव्यांची दुनिया, विद्यार्थ्यांनी काढली मिलेट्सची रांगोळी
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 2, 2023 17:33 IST2023-10-02T17:32:04+5:302023-10-02T17:33:02+5:30
भारतीय वन्यजीव सप्ताहाचे आयोजन

निसर्गमेळ्यातून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली काजव्यांची दुनिया, विद्यार्थ्यांनी काढली मिलेट्सची रांगोळी
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: भारतीय वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून पर्यावरण दक्षता मंडळ विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल प्रबोधन निर्माण व्हावे म्हणून काजवा या थीमवर निसर्गमेळा आयोजित करण्यात आला. प्रत्येक सजीव हा त्याच्या सभोवतालच्या एका किंवा अनेक सजीवांवर अवलंबून असतो. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजीव टिकवणे गरजेचे आहेत. किटकवर्गातील स्वयंप्रकाशित काजवा आज आपल्याला सहज दिसून येत नाही. या निसर्गमेळ्याच्या निम्मिताने काजव्यांची दुनिया जाणून घेण्यासाठी व विविध स्पर्धेसाठी अनेक शाळेतून विद्यार्थी सामील झाले होते.
भारतीय वन्यजीव सप्ताहानिम्मिताने पर्यावरण दक्षता मंडळ, श्रीरंग एज्युकेशन सोसायटी, एन्विरो व्हिजिल आणि लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ याच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी श्रीरंग विद्यालय येथे चित्रकला स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ, इंधनाशिवाय पाककृती स्पर्धा, पथनाट्य, पर्यावरण गीत, मिलेट्सची रांगोळी, सादरीकरण स्पर्धा घेण्यात आल्या. हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले. यानिमित्त मिलेट्सबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून मिलेट्सची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. पाककला स्पर्धेत फळभाज्या, काही पालेभाज्या, काही कडधान्य यांचा वापर करून एखादी पाककला इंधनाशिवाय बनवू शकतो हे इंधन न वापरता पाककला स्पर्धाच्या माध्यमातून अनुभवायला मिळाले. घरट्यासहित पक्ष्याचे चित्र काढणे या विषयावर चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध रंगाचा वापर करून टाइल्स, दगड, काच, कॅनव्हास आदींवर चित्र रेखाटले. टाकाऊ पासून टिकाऊ या सप्रधेत वाया गेलेल्या जीन्सच्या कापडापासून टिकावू वस्तू तयार केल्या. दिवसेंदिवस वाढणारे प्रकाश प्रदूषण, तसेच मोठ्या प्रमाणात झाडे पडण्याची कारणे आणि पृथ्वी अनुकूल जीवनशैली या विषयावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली. माझा जवळचा तलाव या विषयावर विषयार्थ्यांनी सादरीकरण केले. पर्यावरण गीत या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरण गीते सादर केली. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात विद्याधर वालावलकर यांनी संस्थेच्या विविध प्रकल्पाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी पर्यावरण दक्षता मंडळाच्या अध्यक्ष डॉ. मानसी जोशी, सचिव संगीता जोशी, लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे अध्यक्ष लायन हेमंत टी, लायन नयना तारे, लायन हर्षदा टी, लायन रसिक खाणवलेकर, लायन संतोष पर्वतकर, श्रीरंग एज्युकेशन संस्थेचे चेअरमन महेश भोसले आणि सभासद अरुंधती लिमये उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा शिरगावकर यांनी केले.