उल्हासनगरातील १० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट; अतिधोकादायक इमारती तोडणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 10:00 AM2021-05-17T10:00:49+5:302021-05-17T10:01:14+5:30

मोहिनी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचा निर्णय; मृतांवर अंत्यसंस्कार

Structural audit of 10 year old buildings in Ulhasnagar; Extremely dangerous buildings will be demolished | उल्हासनगरातील १० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट; अतिधोकादायक इमारती तोडणार 

उल्हासनगरातील १० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट; अतिधोकादायक इमारती तोडणार 

Next

सदानंद नाईक

उल्हासनगर : मोहिनी इमारत दुर्घटनेची चौकशी अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांची समिती करणार असून, मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच शहरातील १० वर्षे जुन्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला असल्याची माहिती माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.

उल्हासनगर कॅम्प नं. १ येथील मोहिनी पॅलेस इमारतीचा चौथ्या मजल्याचा स्लॅब शनिवारी दुपारी तळमजल्यावर कोसळल्याने हरेश डोटवाल, संध्या डोटवाल, ऐश्वर्या डोटवाल, मॉन्टी पारचे, सावित्री पारचे, असे पाच जण मृत्युमुखी पडले, तर ऋशी कमलेश अचरा, कबीर कमलेश अचरा, अमृत शीतलवाज पवार, संतोष पारचे, अंवतिका पारचे, देवराज पारचे, पूनम पारचे, हर्ष पारचे, कमलेश आचरा, मेंहक आचर, असे दहा जण जखमी झाले. यापैकी ८ जणांना प्राथमिक उपचार करून शनिवारी रात्री सोडून देण्यात आले. कमलेश आचरा व मेहक आचार यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकांच्या निरीक्षणाखाली इमारतीच्या इतर प्लॉटधारकांना घरातील संसारोपयोगी साहित्य नेण्यास परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान, दुर्घटनेत बळी पडलेल्या डोटवाल व पारचे कुटुंबांच्या सदस्यांवर मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डोटवाल कुटुंबातील एकमेव जिवंत राहिलेली २१ वर्षांची अमिषा हिला भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी आश्रय दिला. बेघर झालेल्या इतर कुटुंबांना थारासिंग दरबार यांनी मदत करून राहण्यास जागा दिली. दुर्घटनेनंतर महापालिका अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस कर्मचाऱ्यांनी शोध व बचावकार्य वेळेत करून शनिवारी रात्री १० वाजता शोधकाम पूर्ण झाल्याचे सांगितले.

शहरात एकून १४७ धोकादायक इमारती असून, त्यापैकी २३ इमारती अतिधोकादायक आहेत. २३ पैकी १८ इमारती खाली करण्यात आल्या असून, ४ इमारतींमध्ये नागरिक राहत आहेत. येत्या आठवड्यात चारही इमारती खाली करण्यात येऊन टप्प्याटप्प्याने अतिधोकादायक इमारती तोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. धोकादायक इमारतीचे लवकरात लवकर स्ट्रक्चर ऑडिट करून त्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

Web Title: Structural audit of 10 year old buildings in Ulhasnagar; Extremely dangerous buildings will be demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.