कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठामपा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:59 AM2020-11-30T00:59:36+5:302020-11-30T00:59:49+5:30

कोरोनाची दुसरी लाट येणाची शक्यता गृहीत धरून सर्व हॉस्पिटल्स अद्ययावत ठेवण्याच्या सूचना आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Strongly prepared to face any situation | कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठामपा सज्ज

कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठामपा सज्ज

Next

ठाणे : दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढताना दिसत असून दुसरी लाट येणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या दुसरी लाट आली नसली, तरी संभाव्य परिस्थितीचा विचार करून ठाणे महापालिकेने संपूर्ण तयारी केली आहे. खबरदारी म्हणून कोरोनाचे एकही हॉस्पिटल बंद केले जाणार नसून रुग्णांना वेळेत उपचार मिळतील, असा दावाही पालिकेने केला आहे. परंतु, गणेशोत्सव काळात ज्या पद्धतीने कोरोनाचे रुग्ण वाढले होते, त्या वेगाने नोव्हेंबर महिन्यात वाढताना दिसले नाही. किंबहुना, रुग्णवाढीचे हे प्रमाण कमीच असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तरीही, खबरदारी म्हणून पालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

कोरोनाची दुसरी लाट येणाची शक्यता गृहीत धरून सर्व हॉस्पिटल्स अद्ययावत ठेवण्याच्या सूचना आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढल्यास प्रशासनावर ताण येऊ नये, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आतापासूनच आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. रुग्णवाहिका, ऑक्सिजनचा योग्य पुरवठा, ऑक्सिजन बेड, ॲण्टीजेन व आरटी-पीसीआर चाचण्या करणे तसेच औषधांचा योग्य तो साठा करून ठेवण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागास आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. विशेष म्हणजे काही कोविड सेंटर बंद केल्यानंतरही शहरातील रुग्णालयांत आजच्या घडीला ९० टक्के बेड उपलब्ध आहेत.

दरम्यान, दिवाळीच्या कालावधीत चाचण्यांचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली होती. आता दिवाळीनंतर पुन्हा सहा हजारांच्या घरात चाचण्या केल्या जात असून अजूनही पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण हे दिवसाला २०० च्या आतच असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.  ठाण्यात कोरोना पॉझिटिव्ह रेट हा आठ टक्क्यांवर असून मृत्युदर हा २.३१ टक्क्यांवर आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील ९४  टक्क्यांपेक्षा अधिक आहे. रुग्णवाढीचा आलेख असाच नियंत्रणात राहिला आणि नागरिकांनी नियमांचे  पालन केले, तर दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

Web Title: Strongly prepared to face any situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.