ठाण्यातील शेती स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुटने बहरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:16+5:302021-07-02T04:27:16+5:30

ठाणे : गडचिरोलीप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातदेखील स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट यासारखी जास्त नफा देणारी पिके घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती ...

Strawberry, Dragon Fruit will flourish in Thane | ठाण्यातील शेती स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुटने बहरणार

ठाण्यातील शेती स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुटने बहरणार

Next

ठाणे : गडचिरोलीप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातदेखील स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट यासारखी जास्त नफा देणारी पिके घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी नियोजन भवनात आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात दिली.

जिल्ह्यातील शेतीतज्ज्ञांची मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देणारे उत्पादन कसे घेता येईल, यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी गुरुवारी व्यक्त केले.

ठाणे जिल्ह्यात आधी भात आणि नाचणी ही दोनच पिके घेतली जायची. मात्र, आता भेंडी, भोपळी, मिरची, काकडी, हळद अशी अनेक पिके घेतली जातात. कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन याबाबत मार्गदर्शन केल्यानेच आज यातील काही भाज्या परदेशात निर्यात होत आहेत. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. स्थानिक हवामान पाहून त्यानुसार पिकांचे पॅटर्न ठरवले तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी रानभाज्यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनासह कृषी संजीवनी मोहिमेचा समारोपही त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा बोर्हाडे पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, सीईओ भाऊसाहेब दांगडे, आदी उपस्थित होते.

विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले कृषितज्ज्ञ शेखर भडसावळे यांनी शेतकऱ्यांना नवीन पद्धतीने शेती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. एसआरटी ही भातलागवडीची पद्धत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून, येत्या काही वर्षांत ती या जिल्ह्याचे अर्थकारण पुरते बदलून टाकेल आणि शेतकऱ्यांना नवीन आत्मविश्वास देईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी छत्री, वजनकाटा, प्लास्टिक कॅरेटस आणि स्टँडवाटपासह शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा कीटकनाशक फवारणी करताना घेण्याची काळजी, औषधी वनस्पती लागवड करताना घ्यायची काळजी, भात आणि भेंडीलागवड पद्धती पुस्तिकांचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात प्रगतशील शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, जिल्हास्तरीय हरभरा पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी आणि भात व भेंडीलागवड स्पर्धेतील विजेते शेतकऱ्यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

-

Web Title: Strawberry, Dragon Fruit will flourish in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.