ठाण्यात सराईत चोरट्यासह सराफा व्यावसायिकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 09:43 PM2018-10-14T21:43:46+5:302018-10-14T21:49:25+5:30
लोकल प्रवासात मोबाईल आणि सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढीस लागले आहे. त्यातच, सोनसाखळी चोरट्यासह ज्वेलर्सदाराला पकडण्यात लोकमार्ग पोलिसांना यश आले आहे.
ठाणे : रेल्वेस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या कळव्यातील तारू महंमद अली शेख (२८) या सराईत चोरट्यासह चोरीचे दागिने विकत घेणा-या टिटवाळ्यातील सराफा व्यावसायिक अण्णासो सरक (३९) याला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद करत सात गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्याकडून सुमारे १० तोळ्यांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून त्यांची अंदाजे किंमत तीन लाख रुपये असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी दिली.
ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा रेल्वेस्थानकांत सोनसाखळीचोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. याचदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तारू शेख याला अटक केली. चौकशीत त्याने आॅगस्ट महिन्यातील दोन आणि सप्टेंबर महिन्यातील पाच घटनांची कबुली दिली. त्यातील तीन घटनांतील मुद्देमाल सराफा व्यावसायिकाला विकल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार, त्या सराफा व्यावसायिकास अटक करत, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल तसेच इतर चार गुन्ह्यांतील मुद्देमाल तारू शेख याच्या घरातून हस्तगत केला आहे. सात गुन्ह्यांतील १०५.५०० ग्रॅम वजनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले असून त्याची किंमत दोन लाख ९५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही आरोपींना १५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
.......................................