प्रियकराकडून जीवे मारण्याचा प्रयत्न, तरुणीची मृत्यूशी झुंज; आता महिला आयोगाने घेतली दखल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 11:22 AM2023-12-17T11:22:41+5:302023-12-17T11:26:29+5:30

प्रिया सिंह हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टमधून तिच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती देत अश्वजीत गायकवाड याने हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

State Womens Commission takes cognizance of attack on woman by boyfriend in Thane | प्रियकराकडून जीवे मारण्याचा प्रयत्न, तरुणीची मृत्यूशी झुंज; आता महिला आयोगाने घेतली दखल!

प्रियकराकडून जीवे मारण्याचा प्रयत्न, तरुणीची मृत्यूशी झुंज; आता महिला आयोगाने घेतली दखल!

ठाणे : ठाणे शहरात एक धक्कादायक घटना घडली असून  २६ वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रियकराने मला कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित प्रिया सिंह या तरुणीने केला आहे. या प्रकरणातील आरोपी अश्वजीत गायकवाड हा एमएसआरडीचे एमडी अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा असल्याने त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप पीडितेसह विरोधी पक्षांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली असून याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी 'एक्स'वर माहिती दिली आहे.

ठाण्यातील घटनेवर भाष्य करत रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे की, "ठाणे जिल्ह्यात तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना प्रसारमाध्यमातून समोर आली आहे. पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. या वृत्ताची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे," अशी माहिती चाकणकर यांनी दिली. 

कोण आहे प्रिया सिंह?

हल्ल्यात गंभीर जखमी झालेली २६ वर्षीय प्रिया सिंह ही इन्स्टाग्राम इन्फ्ल्यूएंसर आणि ब्युटिशियन आहे. ती आरोपीसोबत साडेचार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. मात्र हल्लीच तिला गायकवाड याच्या विवाहाविषयी माहिती मिळाली होती. प्रिया सिंह हिचे इन्स्टाग्रामवर ११ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टमधून तिच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती देत अश्वजीत गायकवाड याने माझ्यावर हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

राज्यात गुंडाराज आले आहे का? काँग्रेसला सवाल

ठाण्यात तरुणीवर झालेल्या हल्ल्याची सर्वत्र चर्चा होऊ लागल्यानंतर काँग्रेस प्रवक्त अतुल लोंढे यांनी संताप व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. "शिंदे गट आता एका टोळीमध्ये रुपांतरीत झाला आहे. त्यात त्यांचे आमदार आणि विविध पदांवर बसलेले रिटायर्ड अधिकारी आहेत. निवृत्त झालेल्या लोकांना पुन्हा पुन्हा का पोस्टिंग देत आहेत? ते पैसे कमावून देतात म्हणून? या निवृत्त लोकांची पोरे बापांनी भ्रष्टाचार करून कमावलेल्या पैशांचा माज दाखवत आहेत. MSRDC चे एमडी अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत गायकवाड याने आपल्या मित्रांसोबत मिळून ठाणे येथे एका मुलीला कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, पण आरोपी अद्याप मोकाट आहेत? हे काय चालले आहे?" असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: State Womens Commission takes cognizance of attack on woman by boyfriend in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.