उल्हासनगरातील बाजारपेठ पूर्णवेळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:42 IST2021-07-27T04:42:03+5:302021-07-27T04:42:03+5:30
उल्हासनगर : शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिकांच्या हाताला काम मिळण्यासाठी व व्यापाऱ्यांसाठी बाजारपेठा पूर्णवेळ सुरू करा, अशी ...

उल्हासनगरातील बाजारपेठ पूर्णवेळ सुरू करा
उल्हासनगर : शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिकांच्या हाताला काम मिळण्यासाठी व व्यापाऱ्यांसाठी बाजारपेठा पूर्णवेळ सुरू करा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. व्यापारी व नागरिकांची लॉकडाऊनमुळे दैनावस्था झाल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे.
उल्हासनगर औद्याेगिक शहर आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने गेल्या दीड वर्षापासून व्यापार ठप्प पडला आहे. तर कामगारांच्या हातचे काम गेले. कोरोनाची संख्या कमी झाल्यावर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठविण्यात आले. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांना झाला नाही. शहरातील व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून त्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून बाजारपेठ पूर्णवेळ उघडी ठेवण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे केली.
शहरातील व्यापाऱ्यांना पूर्णवेळ दुकाने उघडण्याची परवानगी न दिल्यास मनसे व्यापारी आणि बाजारपेठेत काम करणाऱ्या कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन करेल, असा इशारा पक्षाच्या वतीने देशमुख यांनी दिला. या वेळी पक्षाचे जिल्हा सचिव संजय घुगे, शालिग्राम सोनवणे, मुकेश सेठपलानी, अनिल गोधडे, तन्मेश देशमुख यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.