Start Kopar Bridge immediately for urgent services -Ramesh Mhatre | अत्यावश्यक सेवांसाठी कोपर उड्डाणपूल सुरू न केल्यास रेलरोकोचा इशारा
अत्यावश्यक सेवांसाठी कोपर उड्डाणपूल सुरू न केल्यास रेलरोकोचा इशारा

 डोंबिवली - कोपर दिशेकडील उड्डाणपूलाचे काम चार महिने झाले तरीही महापालिकेने सुरु केले ना रेल्वेने सुरू केले आहे. ते ते सुरू होईल तेव्हा होऊ दे, पण तोपर्यंत नागरिकांनी, रुग्णांनी हाल सहन करायचे का? पुलाचा काही भाग तातडीने सुरू करावा. अत्यावश्यक सेवांसाठी पुलाचा काही भाग सुरू  करून काम सुरू  करावे अन्यथा रेल रोको करू, असा सज्जड इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. 

मंगळवारी म्हात्रे यांनी कोपर पूलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पाहणी केली, त्या पाहणीत कसलेच काम सुरु नसून तो पूल वाहतूकीसाठी बंद केला असल्याचा संताप आल्याने म्हात्रेंनी थेट रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठवली. रेल्वे अधिकारी, पोलिस यांच्यासमोरच पूल अत्यावश्यक सेवांसाठी खुला करा अन्यथा रेल्वे बंद करु असे सांगत त्रागा व्यक्त केला. ते म्हणाले की, एका गरोदर मातेला रिक्षा मिळत नव्हती, एका रिक्षा चालकाने अडचण बघूनही ठाकुर्ली उड्डाणपूलावरुन फिरुन जाण्यासाठी ३०० रुपये एवढे भाडे सांगितले.

त्यामुळे अखेरीस परवडणार नाही म्हणून त्या महिलेने पूलावरुन जाण्याचा निर्णय घेतला, अखेरीस ती महिला पूलावरतीच प्रसुती झाल्याची माहिती म्हात्रे यांना मिळाली. तसेच एका ज्येष्ठ रुग्णालादेखील शास्त्रीनगर रुग्णालयातून खोकला, दमा होता त्यासाठी औषधोपचारासाठी ठाण्याला जायचे होते, त्यालाही रिक्षा चालकाने अव्वाच्या सव्वा भाडे सांगितले, त्यामुळे तो ज्येष्ठ नागरिक रुग्ण पायी गेला, अवघ्या काही अंतरावर गेल्यावर तो तोल जाऊन पडला. पण जर त्याला वेळीच रुग्णवाहीकेची सुविधा मिळाली असती तर तो पडला नसता.

गेल्या काही दिवसातील या घटना आहेत. त्यामुळे त्याची नोंद रेल्वेने, महापालिका प्रशासनाने घ्यावी आणि तातडीने कोपर पूल दुचाकी, रिक्षा आणि रुग्णवाहीका यांसाठी खुला करावा. अन्यथा वेळ आल्यास रेल्वे बंद पाडू असा दम म्हात्रे यांनी रेल्वेला दिला. तसे पत्र देखिल म्हात्रे हे रेल्वे प्रशासनाला देणार असल्याचे म्हणाले. काम पण करत नाहीत, आणि पूल बंद करुन ठेवला ही कुठली पद्धत असेही म्हात्रे संतापाने म्हणाले.

अत्यावश्यक सेवांसाठी पूल खुला करायलाच लागेल, कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही असा सज्जड दम त्यांनी रेल्वे अधिका-यांना दिला. महापालिका आयुक्तांशीही यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.

Web Title: Start Kopar Bridge immediately for urgent services -Ramesh Mhatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.