स्टार कासवांची तस्करी : आणखी दोघांना मुंबईतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 22:46 IST2018-07-13T22:09:22+5:302018-07-13T22:46:09+5:30
अंगावर स्टार असलेल्याा कासवांसह वेगवेगळया प्रजातींच्या कासवांची तस्करी करणाऱ्या सलमान खान आणि शाह शेख या दोघांना मुंबईच्या मालवणी भागातून ठाण्याच्या वनविभागने १४ कासवांसह अटक केली.

ठाणे वनविभागाची कारवाई
ठाणे : दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करणा-या सलमान रहिमतअली खान (२३) आणि शाह आलम जमील अहमद शेख (३८, रा. दोघेही मालवणी, मालाड) या दोघांना ठाण्याच्या वनविभागाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून १४ कासवांची सुटका करण्यात आली आहे. या दोघांसह आठवडाभरात कासवांच्या तस्करीप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईच्या मालाड पश्चिम भागातील केजीएन आणि तयबा या पेट शॉपमध्ये काही कासवे बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवल्याची गुप्त माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. त्याआधारे सहायक वनसंरक्षक गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक आणि ठाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप देशमुख यांच्या पथकाने १२ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून मालवणी भागातून या दोघांना अटक केली. वनअधिका-यांनी बनावट गि-हाइकाला सलमानच्या दुकानात पाठवून या कासवांची मागणी केली. तेव्हा ही कासवे देताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यामध्ये सलमानकडून सहा तर शाह याच्याकडून आठ अशी १४ कासवे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.