बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या भिवंडीतील कार्यक्रमात चेंगराचेंगरी; शिडीची रेलिंग तुटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 10:30 IST2025-01-05T10:30:15+5:302025-01-05T10:30:53+5:30
व्यासपीठाजवळ प्रचंड गोंधळ पण मोठी दुर्घटना टळली

बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या भिवंडीतील कार्यक्रमात चेंगराचेंगरी; शिडीची रेलिंग तुटली
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हायवे दिवे येथील कार्यक्रमात विभूती घेण्यासाठी भाविकांत शनिवारी चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे धीरेंद्र शास्त्री कार्यक्रम अर्ध्यावर सोडून निघून गेले. पोलिसांनी गर्दी पांगवल्याने मोठी दुर्घटना टळली.
भिवंडीतील दिवे अंजूर येथील इंडियन कॉर्पोरेशन गोदाम संकुलात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा सत्संग व दर्शन कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी दुपारी तीन वाजता केले होते. या कार्यक्रमात शास्त्री यांनी भक्तांना विभूती घेण्यासाठी सर्वप्रथम महिलांना, त्यानंतर पुरुषांना एका रांगेत येण्याचे आवाहन केले. मात्र, विभूती घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याने काही वेळातच गर्दीचा ताण वाढत गेला आणि व्यासपीठावर चढण्यासाठी सर्वांनीच गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली.
यात व्यासपीठावरील शिडीची रेलिंग तुटली. त्यामुळे काही महिला खाली पडल्याने गोंधळ उडाला. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करीत गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला.